३ कोटी द्या, जामीन देताे, दुबईवरून फाेन; नवाब मालिकांच्या मुलाची पोलिसांत धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 06:38 AM2022-03-19T06:38:47+5:302022-03-19T06:38:53+5:30
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केलेले नवाब मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
मुंबई : अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनासाठी ३ कोटी रुपये मागितल्याचा दावा करत, त्यांच्या मुलाने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. त्यानुसार, विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास करत आहे. आरोपीने आधी दुबईवरून संदेश व त्यानंतर ई-मेल पाठवून बिटकॉइनच्या स्वरूपात पैशांची मागणी केली. नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध जोडण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप मलिक कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केलेले नवाब मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मलिक यांच्या जामिनासाठी तीन कोटी रुपये बिटकॉईनच्या स्वरूपात मागितल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा आमीर मलिक यांच्या तक्रारीवरून विनोबा भावे नगर पोलिसांनी भादंवि कलम ४१९, ४२०, ५११ व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६ (ड) अंतर्गत इम्तियाज नावाच्या एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपीचा क्रमांक, संदेश, मेलचे स्क्रीनशॉट पोलिसांना देण्यात आले आहे. संबंधित क्रमांक तसेच मेल आयडीवरून पोलीस अधिक तपास करत आहे.