मुंबई : एसटी महामंडळातील ९८ हजार कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यापासून वेतन नाही. मे महिण्यात ५० टक्के वेतन देण्यात आले. जुनचे वेतन मिळाले नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ निधी द्यावा,अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसच्यावतीने राज्य सरकारकडे केली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात ७५ टक्के, मे महिन्यात ५० टक्के इतके वेतन मिळाले. जून महिन्यात वेतन मिळालेले नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अत्यल्प आहे. तुटपुंज्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होऊन बसले आहे.
लॉकडाऊन कालावधीत सर्वच क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्याचे राज्य सरकारने निर्देश असताना सुद्धा एसटीमध्ये मात्र कर्मचाऱ्यांना अपूर्ण वेतन मिळत आहे. वेतन वेळेवर मिळत नाही, लॉकडाऊन असल्याने मुंबई, ठाणे व पालघरमध्ये, जिल्हाअंतर्गत काही प्रमाणात वाहतूक चालू असून १६ हजार फेऱ्यापैकी फक्त सुमारे १ हजार ८०० फेऱ्या चालू आहेत. उत्पन्न नसल्याने एसटीची आर्थिक परिस्थिती खालावली असून कर्मचाऱ्यांना पूर्ण व वेळेवर वेतन मिळण्यात अडचणी येत आहेत. एसटीची आर्थिक परिस्थिती पाहता एसटीला राज्य सरकारने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. यासंदर्भात महामंडळाने राज्य सरकारकडे आर्थिक मदत मिळावी, एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी गुरुवारी राज्य सरकारकडे दिले आहे.