Join us

कोरोनापूर्व काळाप्रमाणेच वेतन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:06 AM

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची मागणी; हवाई वाहतूक मंत्र्यांना लिहिले पत्रलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या वर्षभरापासून एअर इंडियाने कर्मचाऱ्यांच्या ...

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची मागणी; हवाई वाहतूक मंत्र्यांना लिहिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या वर्षभरापासून एअर इंडियाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्क्यांहून अधिक कपात केली आहे. त्यामुळे अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत असून, आम्हाला कोविडपूर्व काळाप्रमाणे वेतन देण्यात यावे, अशी मागणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशनने (आयसीपीए) यासंदर्भात हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांना पत्र लिहिले आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा दिली आहे. लॉकडाऊन काळात इतर विमान सेवा बंद असल्या, तरी एअर इंडियाने वंदे भारत अभियानांतर्गत परदेशात जाऊन तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणले. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता देशसेवेस सर्वोच्च प्राधान्य दिले. असे असतानाही कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे वेतन देण्यात आलेले नाही. कोरोना सुरू झाल्यापासून ५० टक्क्यांहून अधिक पगारकपात केली जात आहे. त्यामुळे कर्मचारी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत, असे आयसीपीएने पत्रात म्हटले आहे.

कोरोनाचे कारण पुढे करून एअर इंडिया व्यवस्थापन अनधिकृतपणे कर्मचाऱ्यांचे वेतन कापत आहे. व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांविरोधी धोरणांबाबत आपल्या कार्यालयाला वेळोवेळी कल्पना दिली आहे; परंतु आजवर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे हतबल होऊन थेट आपणास पत्र लिहित आहोत. आपण आमच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. तसेच कोविडपूर्व काळाप्रमाणे वेतन देण्याची सूचना व्यवस्थापनास करावी, अशी मागणी आयसीपीएने केली आहे.

--------------------------