Join us  

कंडक्टरला आता रोख नव्हे,‘एटीएम’ने द्या पैसे; ATM व UPI द्वारे काढता येणार तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 1:10 PM

मुंबई विभागातील पाच आगारांमध्ये नवीन अँड्रॉइड तिकीट मशीन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एस.टी.च्या ईटीआयएम मशीनमध्ये वारंवार होणारे बिघाड, सुट्या पैशांवरून प्रवासी व वाहकांमधील ‘तू-तू में में’ आता इतिहासजमा होणार आहे. कारण एस.टी. महामंडळाने बसमध्ये प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी मुंबई विभागातील पाच आगारांमध्ये नवीन अँड्रॉइड तिकीट मशीन वाहकांना उपलब्ध केले आहेत. त्यामुळे वाहकही स्मार्ट झाले असून, खिशात रोख पैसे नसतानाही एस.टी.तील प्रवाशांना आता गुगल-पे, फोन पे कार्ड पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढता येणार आहे.

एस.टी. महामंडळाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या अँड्रॉइड प्रणालीवर आधारित नवीन ईटीआयएम तिकीट मशीन पुरविण्यासाठी निविदा काढली होती. तसेच नवीन प्रणालीमधून वाहकांद्वारे प्रवाशांना विविध पर्यायांमधून तिकिटांचे पेमेंट करण्याची सुविधा आहे.  या नव्या ई- तिकीट मशीन ॲंड्रॉईड सॉफ्टवेअरवर काम करणार असल्याने त्याचा फायदा एस.टी. प्रशासनाला, तसेच प्रवाशांनादेखील होणार आहे. या मशीन आधुनिक असल्याने ई-तिकीट काढण्याबरोबरच त्यात प्रवाशांना तिकिटाचे विविध पर्याय मिळणार आहेत. आधीच्या ईटीआयएम मशीन वारंवार नादुरुस्त होत होत्या.

    एस.टी.चा ठावठिकाणाही कळणार एस.टी. महामंडळाकडून ईटीआय मशीन प्रत्येक वाहकाला त्याच्या नावावर दिले जाणार आहे. त्याचे नाव, मार्ग, तिकीट स्त्री की पुरुष, अमृत योजना, पंच पास, सवलत असेल तर त्याकरिता वेगळी तरतूद, एस.टी. बस नेमकी कोठे आहे, आदी कळणार आहे.

याआधी पैसे किंवा सवलत पास असल्यास प्रवास करता येत होता. मात्र, आता एटीएम व यूपीआयद्वारे तिकिटाचे पैसे देता येणार आहेत.

 यूपीआय कार्यरत होण्यासाठी अकाऊंट उघडण्याची प्रक्रिया झाली असली तरी सुरू होण्यासाठी वेळ लागेल.

टॅग्स :एसटीमुंबई