या महिन्यात दोन वेळा भरा लाइट बिल; ज्यांनी भरणा केला नाही, त्यांना...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 10:56 AM2023-05-02T10:56:54+5:302023-05-02T10:57:14+5:30
सुरक्षा ठेव रक्कम पूर्वी एक महिन्याच्या बिलाइतकी होती. मात्र आता एप्रिल २०२२ पासून ती दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे
मुंबई - वीजग्राहकांना एप्रिल अथवा मे महिन्याच्या वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. या अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेचा वीज ग्राहकांनी भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास महावितरणकडून कमाल सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबाबतचा संदेश सुरक्षा ठेवीच्या बिलावर नमूद करण्यात आला आहे.
सुरक्षा ठेव रक्कम पूर्वी एक महिन्याच्या बिलाइतकी होती. मात्र आता एप्रिल २०२२ पासून ती दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीही एप्रिल २०२२ मध्ये ही बिले आली होती. त्यावेळी ज्यांनी भरणा केला नाही, त्यांना यावर्षी पुन्हा बिले पाठविण्यात आली आहेत. वीज आयोगाने ही रक्कम भरण्यासाठी सहा हप्त्यांची सवलत दिली आहे. मात्र महावितरणने एकरकमी संपूर्ण रकमेची मागणी बिले लागू केली आहेत. त्या बिलांमध्ये ही रक्कम ६ महिन्यांत ६ हप्त्यांत भरता येईल. - प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना
सहा हप्त्यांत रक्कम भरा
ज्या ग्राहकांना एकरकमी भरणा शक्य नाही, अशा ग्राहकांनी ही रक्कम सहा हप्त्यांत भरावी. अथवा तेही शक्य नसल्यास २० किलोवॉटपेक्षा कमी जोडभार असलेल्या ग्राहकांनी प्रीपेड मीटरची मागणी करावी. म्हणजे कोणतीही सुरक्षा ठेव भरावी लागणार नाही. तसेच २ टक्के वीजदर सवलत मिळण्यास मदत होणार आहे.
सुरक्षा ठेवीची रक्कम
दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीज ग्राहकांची सुरक्षा ठेव ही मासिक बिल असेल तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे. ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित दरानुसार व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना दिली जाते.
लघुदाब वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर व मोबाइल ॲपवर सुविधा उपलब्ध आहे.
ग्राहकांचा हक्क
देयक रक्कम भरण्यासाठी कोणता पर्याय निवडायचा हा ग्राहकांचा हक्क आहे. त्यामुळे कंपनी ग्राहकांची कोणत्याही पर्यायाची मागणी नाकारू शकत नाही. प्रीपेड मीटरसाठी वीज ग्राहकांनी संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे अर्ज करावा.