पायल तडवी आत्महत्या प्रकरण; आरोपींची उच्च न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 12:19 AM2019-07-03T00:19:21+5:302019-07-03T00:19:34+5:30
२४ जून रोजी विशेष न्यायालयाने डॉ. हेमा अहुजा, डॉ. अंकिता लोखंडवाल आणि डॉ. भक्ती मेहरे यांचा जामीन अर्ज फेटाळला.
मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेल्या तीन डॉक्टरांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.
२४ जून रोजी विशेष न्यायालयाने डॉ. हेमा अहुजा, डॉ. अंकिता लोखंडवाल आणि डॉ. भक्ती मेहरे यांचा जामीन अर्ज फेटाळला. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला या तिघींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या तिघींना जामीन नाकारताना विशेष न्यायालयाने म्हटले की, या तिघी फरार होण्याचा किंवा पुराव्यांची छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेमा, अंकिता आणि भक्ती या सतत पायलवर जातिवाचक टिप्पणी करत. तिघींच्या मानसिक त्रासाला कंटाळून पायलने आत्महत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
आपल्याला नाहक या केसमध्ये अडकविण्यात आले आहे. आपण केवळ कामावरून तिची टर
उडवत होतो. ती कोणत्या जातीची होती, हे पण आम्हाला माहीत नव्हते, असे तिन्ही आरोपींनी जामीन अर्जात म्हटले आहे. त्यांच्या याचिकेवर ९ जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
या तिघी २९ मे पासून कारागृहात आहेत.