आतापर्यंतच्या तपासातून पायलची हत्या झाल्याचे निष्पन्न होत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 04:02 AM2019-06-01T04:02:20+5:302019-06-01T04:02:38+5:30
पोलिसांची न्यायालयाला माहिती : आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी
मुंबई : डॉ.पायल तडवीच्या शरीरावर काही जखमा आढळल्याने, तिच्या वकिलांनी पायलची हत्या झाल्याची शक्यता वर्तविली. मात्र, शुक्रवारी आग्रीपाडा पोलिसांनी पायलची हत्या झाली नसून, तिने आत्महत्या केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट होत असल्याचे विशेष सत्र न्यायालयाला सांगितले. या प्रकरणी आणखी तपास करता यावा, यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपींचा ताबा मागितला. मात्र, न्यायालयाने पोलिसांची विनंती अमान्य करत, आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. गुन्हे शाखेला तपासासाठी वेळ मिळावा, यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली.
या प्रकरणी पायलची मैत्रीण डॉ. स्नेहल शिंदे हिने पोलिसांकडे जबाब नोंदविला असून, तिने आरोपी हेमा आहुजा, अंकिता खंडेलवाल आणि भक्ती मेहरे पायलला किरकोळ कारणांवरून जातिवाचक टिप्पणी करत असल्याचे सांगितले. त्यामुळे साक्षीदार आणि तिन्ही आरोपींना समोरासमोर बसवून प्रश्न विचारायचे आहेत, त्यासाठी आणखी काही वेळ लागेल. त्याशिवाय आणखी काही साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत, असे पोलिसांनी विशेष न्यायालयाचे न्या. र.म. सादराणी यांना सांगितले.
पोलिसांनी पायलची हत्या करण्यात आल्याची शक्यता नाकारली आहे. पायलच्या गळ्यावर जखमा दिसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिने आत्महत्या केली नसून, हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला. त्यामुळे पायलचे वकील नितीन सातपुते यांनी बुधवारच्या सुनावणीत या प्रकरणाचा तपास हत्येच्या दृष्टिकोनातून करण्यात यावा, अशी विनंती केली.
जे. जे. रुग्णालयाने सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालातून पायलची हत्या करण्यात आल्याचे अद्याप निष्पन्न झाले नाही. त्यांनी पुढील अहलाव राखून ठेवला आहे. त्यानंतर, स्पष्टता येईल. मात्र, आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासातून पायलची हत्या झाल्याचे स्पष्ट होत नाही, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
‘सीनिअर्स छळ करायचे’ - पोलिसांचा अंदाज
‘पायलने मागासवर्गीय कोट्यातून पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळविल्याने तिचे सीनिअर्स तिचा छळ व अपमान करीत. रुग्णालयाचे अन्य कर्मचारी व रुग्णांच्या समोर तिच्यावर जातिवाचक टिप्पणी करून तिला अपमानित केले जायचे. आरोपींना पायल अनुसूचित जातीची असल्याचे माहीत होते. त्यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचे दिसते. त्यामुळे या कटात आणखी कोणी सहभागी आहे का? याचा खोलवर तपास करणे आवश्यक आहे,’ असे पोलिसांनी रिमांड अर्जात म्हटले आहे.
बचाव पक्षाचा आक्षेप
बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याच्या पोलिसांच्या अर्जावर आक्षेप घेतला. ‘केवळ साक्षीदार आणि आरोपींना समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यासाठी आणि तपास एका तपासयंत्रणेकडून अन्य तपासयंत्रणेकडून वर्ग करण्यात आल्याने, आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली जाऊ शकत नाही. तपास वर्ग करण्याचा आदेश न्यायालयाने दिला नव्हता किंवा तशी मागणी कोणी केली नव्हती,’ असा युक्तिवाद बचावपक्षाच्या वकिलांनी न्यायालयात केला.
पोलिसांची मागणी अमान्य
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून पोलिसांची विनंती मान्य करण्यास नकार दिला. ‘आरोपींविरोधात सबळ पुरावे नाहीत, तसेच ही आत्महत्या नसून हत्या आहे, हेही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे केवळ साक्षीदार आणि आरोपींना समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली जाऊ शकत नाही,’ असे म्हणत न्यायालयाने आरोपी डॉक्टरांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यास नकार दिला. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्याने आरोपींचे वकील सोमवारी न्यायालयात तिघींचा जामीन अर्ज दाखल करणार आहेत, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.