Join us

पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतर 9 वर्षांनी बेरोजगार पतीला मिळाली १ कोटींची नुकसान भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 1:21 PM

ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या पत्नीवर अवलंबून असणाऱ्या बेरोजगार पतीला विम्यांतर्गत एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात दावा प्राधिकरणाने विमा कंपनीला दिला आहे.

ठळक मुद्देट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या पत्नीवर अवलंबून असणाऱ्या बेरोजगार पतीला विम्यांतर्गत एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात दावा प्राधिकरणाने विमा कंपनीला दिला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचा पती आर्थिकदृष्ट्या तिच्यावरच अवलंबून होता

मुंबई- ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या पत्नीवर अवलंबून असणाऱ्या बेरोजगार पतीला विम्यांतर्गत एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात दावा प्राधिकरणाने विमा कंपनीला दिला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचा पती आर्थिकदृष्ट्या तिच्यावरच अवलंबून होता. पत्नीच्या निधनानंतर उदरनिर्वाह करणं कठीण झाल्याने विम्याचे पैसे मिळण्याचा दावा त्या व्यक्तीने केला होता. द टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या अनाघा नावाच्या महिलेचा २००८ साली अंधेरी पुलाजवळ ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला होता. ही महिला तिच्या पतीबरोबर गाडीवरून ऑफिसला चालली होती. त्यावेळी हा अपघात झाला. या अपघातात अनघा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी तिचा पती विवेक (वय २६ आत्ताचं वय 37) हा बेरोजगार होता. घरात पत्नी ही एकटीच कमावती सदस्य होती असा दावा विवेकने केला होता. तसंच त्याने नुकसान भरपाई मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. हा अपघात ट्रक चालक बाबूराव अग्रवालच्या चुकीमुळे झाला होता. त्याने अनाघाच्या मोटारसायकलला धडक दिल्यानंतर तिचा हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच मृत्यू झाला होता हे तपासादरम्यान सिद्ध झालं होतं. 

सुरूवातीला विवेकने केलेली तक्रार खोटी असल्याचं सांगून 'गाडी मालक आणि न्यू इंडिया विमा लिमिटेड कंपनी'ने विवेकची तक्रार फेटाळून लावली होती. विवेकची तक्रार खोटी असल्याचा दावा कंपनीने केला होता. पण मोटार अपघात दावा प्राधिकरणाने यासंदर्भात विवेकशी सविस्तर चर्चा केली. पोलिसांनी अपघाताचा केलेला तपास, याप्रकरणाची कागदपत्रं तपासल्यानंतर महिलेचा मृत्यू हा ट्रकच्या धडकेमुळेच झाल्याचं स्पष्ट झालं. यासगळ्यानंतर प्राधिकरणाने विवेकच्या बाजुने निर्णय दिला. अनाघा या एका कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत होत्या. त्यांची वर्षभराची कमाई ही ३५ ते ४० लाख रुपये इतकी होती. पतीचे पत्नीवर अवलंबून असणे तसेच पतीची बेरोजगारी या दोन मुद्यांवर प्राधिकरणाने विमा कंपनीने विवेकला १ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश दिला.