- हितेन नाईक, पालघरपालघरच्या महाराष्ट्र बँकेच्या दोन शाखांमधून ५५ लाख १० हजारांच्यावर रक्कम यूपीआय सिस्टम प्रणालीने आॅनलाइन ट्रान्स्फर झाल्याने मोठा घोटाळा झाला आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीसाठी आपला अहवाल पालघर पोलिसांकडे दिला आहे. या प्रकरणात पालघर आणि भार्इंदरमधील तीन ग्राहकांसह बँकेच्या काही कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारासाठी रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने बँकांची विविध आॅनलाइन अॅप्स जनसुविधेसाठी व कॅशलेस व्यवहारासाठी अंमलात आणली. यानुसार बँकेच्या या अॅप्समधून कुठेही जलदरीत्या पैसे पाठविण्याची आॅनलाइन प्रणाली व मुभा ग्राहकांना देण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र बँकेच्या महाअॅप या प्रणालीवरून ५५ लाख १० हजारांची रक्कम इतर ग्राहकांच्या बँकांच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रणालीमध्ये महाराष्ट्र बँकेच्या छोट्याशा चुकीमुळे बँकेला इतका मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे.मात्र, यामध्ये ग्राहकांना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही किंवा घाबरण्याचेही कारण नाही. हा बँकेचा मुद्दा असून, बँक तो सुव्यवस्थितरीत्या प्रशासनामार्फत राबवित आहे, अशी माहिती बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली आहे. त्यामुळे या प्रकरणातील बँकेचे पैसे हडप केलेल्या दोषींविरोधात चौकशी करून पालघर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकरणी बँकेचे पैसे हडप करणाऱ्या दोषींविरोधात त्वरित कारवाई करावी, अशी मागणी पालघर कृती समितीचे अध्यक्ष सतीश दहिवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
भलत्याच खात्यांत ५५ लाखांचा भरणा
By admin | Published: March 18, 2017 2:30 AM