Join us

वीज बिलांचा भरणा : चेक बाऊंस झाल्यास ७५० रुपये दंड 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 4:30 PM

वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी धनादेशाऐवजी ऑनलाईन पर्यायांना प्राधान्य द्यावे,

 

मुंबई : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेतील कामकाजावर परिणाम झालेला असून वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत असल्याने वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी धनादेशाऐवजी ऑनलाईन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजबिलांच्या देय मुदतीनंतर धनादेश वटल्यास पुढील महिन्याचे बिल थकबाकीसह येण्याची शक्यता आहे. तसेच काही कारणास्तव धनादेश बाऊंस झाल्यास महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यासाठी ७५० रुपये दंड देखील पुढील वीजबिलात लागू शकतो. यामुळे ग्राहकांना  नाहक त्र꠰स सहन करावा लागू शकतो.

  वीज ग्राहकांनी धनादेशाद्वारे वीजबिलांचा भरणा केला असेल तर नियमानुसार ज्यादिवशी धनादेश वटविला जाईल त्याच दिनांकाला सदर रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग केली जाते. मात्र  लॉकडाऊनमुळे अनेक बँकांमध्ये मनुष्यबळांची संख्या मर्यादित असून  प्रतिबंध क्षेत्रातील बँक बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकाने वीजबिलाकरिता धनादेश दिला असेल तर बँकांकडून धनादेश वटविण्यास उशिर होत आहे. वीजबिलांवर  महावितरणच्या बँकेचे छापील तपशील असणाऱ्या ग्राहकांनी आरटीजीएस व एनईएफटीचा वापर करावा असेही आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान, जून महिन्यात प्रतिबंध क्षेत्र वगळता उर्वरित भागात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर महावितरणने वीजमिटरचे रीडिंग व वीजबिलांचे वाटप तसेच वीजबिल भरणा केंद्र सुरू केले आहे. जूनमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांच्या अचूक वीजवापराचे मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल देण्यात आले आहे. त्याबाबतचा संभ्रम दूर होऊन आता वीजबिल भरण्यास वेग आला आहे.

टॅग्स :बँकमुंबईमहाराष्ट्रलॉकडाऊन अनलॉक