Join us

वेतनच नाहीतर खर्चासाठी पैसे कोठून आणायचे ?

By admin | Published: September 22, 2015 12:27 AM

मुंबई शहरात कोणावरही उपाशी राहण्याची वेळ येत नाही असे म्हटले जाते, पण ऐन गणेशोत्सवाच्या काळात खात्यांतर्गत बदलीनंतर दुसरीकडे नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर झालेल्या

मनीषा म्हात्रे, मुंबईमुंबई शहरात कोणावरही उपाशी राहण्याची वेळ येत नाही असे म्हटले जाते, पण ऐन गणेशोत्सवाच्या काळात खात्यांतर्गत बदलीनंतर दुसरीकडे नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर झालेल्या दोन हजार पोलिसांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. आॅगस्ट महिन्याचे वेतन न मिळाल्याने समोर आ वासून उभा असलेला खर्च भागविताना त्यांच्या नाकापर्यंत पाणी आले आहे. त्यात बरेच जण भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरांमध्ये राहतात, तर काहींनी कर्जावर मुंबईत घरे घेतली. अशामध्ये फरफट होणाऱ्या पोलिसांनी ‘लोकमत’कडे मांडलेल्या या व्यथा...कर्जाचा वाढता डोंगर...माझी २००५ मध्ये मुंबईत बदली झाली. सुरुवातीला पर्सनल लोन काढून उदनिर्वाह करण्याचे ठरविले. त्यानंतर लग्न झाले. दोन वर्षांपूर्वी १० लाखांचे कर्ज काढून मुंबईत घर घेतले. हातात २२ हजार वेतन येते़ त्यात अडीच हजार पर्सनल लोन आणि साडेसात हजार घरकर्जासाठी जातात़ अशात उर्वरित पैशांमध्ये कुटुंबीयांचा उदनिर्वाह होतो. त्यात ऐन गणेशोत्सवाच्या काळात पगार न मिळाल्याने बँकेकडून दंडाच्या रकमेची त्यात भर पडत असल्याचे एका पोलीस नाईकाने सांगितले.बहिणीच्या हॉस्टेलमध्ये आसरा...जळगावहून मुंबईत बदली झाल्यानंतर राहायचे कुठे, असा प्रश्न उभा ठाकला होता. त्यात तुटपुंजा पगारावर अव्वाच्या सव्वा घरभाडे देणे परडवणारे नव्हते. म्हणून शिक्षणासाठी मुंबईतील एका हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या बहिणीचा आधार घेण्याचे ठरविले. मात्र यामध्ये जर मी पकडले गेले असते, तर माझी नोकरी गेली असती आणि बहिणीलाही हॉस्टेलमधून काढून टाकले असते. तरी तब्बल सहा महिने काहीच पर्याय समोर नसल्याने एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे बहिणीकडे काढले. अशात आता वेतन वेळेवर मिळत नसल्याने एक एक दिवस काढणे कठीण होत असल्याचे एका महिला हवालदाराने बोलून दाखवले. घरच्या बाप्पासाठी पैसे नाहीत...गावच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पा विराजमान होतात. यंदाच्या वर्षी पगार उशिरा झाल्याने ऐन गणेशोत्सवाच्या काळात कुटुंबीयांना पैसे द्यायला नव्हते. अशात मित्राकडून उधारीवर पैसे घेऊन कुटुंबीयांना दिलेत. कांजूरमार्ग येथील चाळीमधील खोलीत आम्ही भाड्याने राहत आहोत. जनतेच्या सेवेसाठी आम्ही नेहमी तत्पर असतो; मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्वत:च्या कुटुंबीयांचा भारदेखील उचलू शकत नाही याची खंत वाटत असल्याचे एका पोलीस शिपायाने सांगितले.