गौरी टेंबकर-कलगुटकर मुंबई : ऑनलाइन क्लास सुरू करत शिक्षण पूर्ण करण्याचा दावा शाळांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात विद्यार्थी याला योग्य ते सहकार्य करत नाहीत. पालक रडकुंडीला आले आहेत. सुरुवातीचे दोन दिवस अत्यंत प्रामाणिकपणे आणि मन लावून अभ्यासाला बसणारी मुले आता क्लास बंक करण्याचा बहाणा शोधत आहेत. त्यानुसार नेमकी या क्लासेसची स्थिती सध्या कशी आहे, याचा आढावा ‘लोकमत’ने घेतला आहे.माझ्याकडे स्मार्टफोन अथवा टॅब अशी कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे आॅनलाइन वर्गाला उपस्थिती लावता येत नाही. आॅनलाइन वर्गात आज काय शिकविले? हे मित्रांना फोन करून विचारावे लागते. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत अशांना शाळेकडून स्मार्टफोन देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तोपर्यंत आॅनलाइन अभ्यासाला गैरहजेरी असणार आहे. - ओम शशी शिंदे, १० वी, एस. के. पंतवालावलकर हायस्कूल, कुर्लाआॅनलाइन शाळा भरत असल्याने मोबाइलवर शिक्षण घ्यावे लागत आहे. आॅनलाइन शिक्षण आणि प्रत्यक्ष शाळेतले शिक्षण यात खूप फरक आहे. शाळेत शिक्षक शिकवत असताना त्यांचे मुलांकडे बारकाईने लक्ष असते. आॅनलाइन शिक्षण घेताना तसे लक्ष राहत नाही. परंतु पर्याय नसल्याने आॅनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे थोडा तरी अभ्यास करायला मिळत आहे. अन्यथा अभ्यासाची सवय मोडून जाईल. - संचित जीवन तांबे, ७ वी, ओ.एल पी.एस. स्कूल, चेंबूरआमची आॅनलाइन शाळा सुरू झाली, तेव्हापासून आॅनलाइन शिक्षणाबद्दल मला आवड निर्माण झाली आहे. आॅनलाइन अभ्यासक्रमात आम्हाला विविध आॅडिओ-व्हिज्युअल आणि गेम्ससह शिकण्याचा आनंद मिळत आहे. अभ्यासक्रम समजावून सांगण्यात शिक्षकही प्रयत्नशील दिसत आहेत. लॉकडाऊन असूनही नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यास मिळत आहे. तसेच मित्रांनासुद्धा आॅनलाइन भेटण्याचा आनंद होत आहे. - श्रेया चिराग शाह, ४ थी, ग्रीन एकर्स अॅकॅडमी स्कूल, चेंबूरशिक्षणाला तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची हीच खरी संधी आहे व शाळाही त्यालाच महत्त्व देत आहे. आॅनलाइन गृहपाठ तसेच प्रकल्प पूर्ण केल्याने मला शैक्षणिक शिस्त मिळविण्यात मदत झाली. आॅनलाइन शिक्षण बहुतेक विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे हे लक्षात घेता शिक्षक आमच्याशी अत्यंत समजूतदारपणे वागत आहेत. आॅनलाइन शिक्षणात शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. - झील सचिन शाह,७ वी, जे.बी.सी.एन. इंटरनॅशनल स्कूल, परळआॅनलाइन भरणाऱ्या शाळेबद्दल मनात उत्सुकता होती. घरात बसूनच शाळेचा अभ्यास होत असल्याने चांगले वाटत आहे. अनेकदा इंटरनेट कनेक्शन नसल्याने आॅनलाइन शिक्षणात व्यत्यय निर्माण होतो. वर्गातील सर्व मुलांसाठी आॅनलाइन शिक्षण हा नवीनच प्रकार असल्याने त्याच्यासोबत जुळवून घेण्यास थोडा वेळ लागत आहे. - अस्तित्व अनिल तळे, ५ वी, स्वामी विवेकानंद हायस्कूल, चेंबूरइंटरनेटचा कमी स्पीड आणि तुटक आवाजशाळेकडून ‘आॅनलाइन’ क्लास घेतला जात असला तरी इंटरनेटचा स्पीड योग्य नसल्याने किंवा नेटवर्क समस्येमुळे शिक्षकांचा आवाज ब्रेक किंवा तुटक येतो. त्यामुळे ते काय बोलत आहेत हेच समजत नाही. एखादा विषय समजून घेण्यात अडचणी येत आहेत. विशेषत: गणितासारखे विषय तर डोक्यावरूनच जात आहेत. अधिक स्पीडसाठी जास्त पैसे मोजून डेटा पॅक पालकांना घ्यावा लागत आहे. तसेच टेक्नोसॅव्ही नसलेल्या पालकांना तर लॉगिनपासून सगळ्याच गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे.मुलांचे डोळे वाचविण्यासाठी पालकच करतात ‘होमवर्क’पीडीएफवर ‘होमवर्क’ पाठवला जातो. तो पूर्ण करताना मोबाइल तासन् तास हातात घेऊन पालकांना बसावे लागते. सध्या तर मुलांचे डोळे खराब होतील या भीतीने पालक स्वत:च मोबाइलवर अभ्यास पूर्ण करून देत आहेत.व्हिडीओ आॅफ करून सुरू असतो ‘डान्स’मध्ये दहा मिनिटांचा ब्रेक देत सतत तीन तास मुलांना स्क्रीनवर खिळवून ठेवले जाते. त्यामुळे अनेकदा मुले व्हिडीओ आॅफ करून थोडा डान्स आणि स्ट्रेच करत पुन्हा क्लासला बसत आहेत. मात्र त्यानंतरही त्यांची स्थिती रेंगाळल्यासारखीच असते. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात शाळा सुरूच करू नये असेही पालकांकडून सांगितले जात आहे.आॅनलाइन शाळेत चाललाय अभ्यासाचा भडिमारमहाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून आदेश निघाल्यानंतर आॅनलाइन अभ्यासाचा मार्च महिन्यापासून महापूर आला आहे. मुलांची उन्हाळी सुट्टीही आॅनलाइन अभ्यासामध्ये गेली असल्याने शेवटी अतिरेक झाला की मुलांना कंटाळा येणार याचा अनुभव मुख्याध्यापक संघटना करत आहे, आणि यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहे. आॅनलाइन अभ्यासाला अनेक तांत्रिक, परिस्थितीनुरूप अडचणी येत आहेत, त्याबाबत कोणताही पर्याय अजून उपलब्ध केलेला नाही. इंटरनेटचा अतिरिक्त खर्चभार शिक्षकांवर येत आहे. आॅनलाइन शिक्षण हे आर्थिक बाबीकरिता सुरू केले आहे, असेच वाटते. कारण हे शिक्षण पूर्णपणे मोफत द्यावे, असा आदेश शासनाने काढणे आवश्यक होते. तसा कोठेही उल्लेख नाही. हे शिक्षण विभागाकडून लादलेले आहे. याचे अवडंबर माजवले जात आहे. आॅनलाइन शिक्षण हे मर्यादित हवे. त्याचा लाभ सर्वांना घेता येत नाही. शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा शिकवावे लागणार आहे. त्याची तयारी सुरू आहे व ही फक्त मलमपट्टी आहे. - प्रशांत रमेश रेडिज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटनाई-शैक्षणिक आहे साहित्याचा अभावआॅनलाइन अध्यापनासाठी असेलेली खासगी अॅप्सची मांडणी मुलांना चटकन आवडेल अशी आकर्षक आहे. पूर्वीच्या शाब्दिक पाठांतराची जागा आता दृश्यांनी घेतली आहे. विद्यार्थ्याला शिकण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या, कृतीतून शिक्षण देणाºया साहित्याचा अभाव सध्याच्या ई-शैक्षणिक साहित्यात मोठ्या प्रमाणावर दिसतो. स्थानिक भाषांमधील, विद्यार्थ्यांचे राहणीमान, संस्कृती आणि अनुषंगिक भावविश्व याला समर्पक साहित्याची उपलब्धता नसणे हा अजून एक प्रश्न आहे. शालेय स्तरावर आॅनलाइन शिक्षणाचा आग्रह करताना त्याच्या सद्यस्थितीकडे सजगपणे पाहिले नाही तर शिक्षण खरच ‘आभासी’च राहील. आॅनलाइनखेरीज अन्य पर्यायांचा विचार व्हावा.- डॉ. किशोर रमाणी, मानसोपचारतज्ज्ञकाही लाभ, काही तोटेआॅनलाइन शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना जे कार्यक्रम दिले जातात त्यांचा दर्जा अत्यंत चांगला असणे गरजेचे आहे. मुले जेव्हा आॅनलाइन शिक्षण घेत असतील तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय शिक्षण मसुद्यामध्येही सहा वर्षांवरील विद्यार्थ्यांना मोबाइल वापर करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र किती काळ त्याचा वापर करायचा याचे नियंत्रण पालकांनी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सध्याच्या नवीन पिढीला मोबाइल व इतर गॅझेटला वगळून पुढे जाता येणे शक्य नाही. त्यामुळे या सर्व बाबींची दखल घेऊन नियंत्रित पध्दतीने आॅनलाइन पद्धतीचा अवलंब करता येऊ शकेल. - वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञआॅनलाइन शिक्षण हा आजच्या अभ्यासासाठी केवळ एक पर्याय म्हणून पाहण्याची गरज आहे. शिक्षकांना पूर्ण प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. ते कोणत्याही शिक्षकांना नाही. विद्यार्थ्यांची सायबर सिक्युरिटीही सगळ्यात महत्त्वाची प्राथमिकता आहे. मात्र विद्यार्थी व शिक्षकांना याचे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न दिल्याने त्यांच्या सुरक्षिततेला मोठा धोका आहे. विद्यार्थी एकमेकांचे मेल आयडी आणि लिंक एकमेकांना शेअर करून शिक्षकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या अभ्यासाच्या स्क्रीनवर विविध इमोजी व स्टिकर्स पाठवून फेक अटेंड्सही लावण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनाने शिक्षकांच्या आणि पालकांनी मुलांच्या सायबर सुरक्षिततेची काळजी घ्यायला हवी. अनेक शिक्षक वर्क फ्रॉम होम करत असताना नेटवर्क व इंटरनेटच्या खूप समस्यांना समोरे जावे लागत आहे. त्याच्या अतिरिक्त खर्चाचा भार शिक्षकांच्या माथी मारला जात आहे. त्याची भरपाई कोण करणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.- उदय नरे, शिक्षक, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलशेजारी, त्यांची मुलेही डोकावतात ‘स्क्रीनमध्ये’!मुलांना आॅनलाइन शिक्षणादरम्यान एकांत मिळेल अशा ठिकाणी बसवण्याचा सल्ला शाळेने दिला आहे. जी मुले चाळीत लहान खोल्यांमध्ये राहतात त्यांना घरात शांतता मिळतच नसल्याचे पाहायला मिळत आहे. बºयाचदा तर शेजारी व त्यांची लहान मुले मोबाइल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये डोकावत असल्याचेही प्रकार घडत आहेत.परिणामकारक नाहीप्रत्यक्ष वर्गात शिकण्याएवढी परिणामकारकता या आभासी वर्गांमध्ये अर्थातच नाही. वर्गातील वातावरण नियंत्रित असते तेथे मुलांचे लक्ष खिळवून ठेवणे जेवढे शक्य होते तेवढे अनियंत्रित आभासी वर्गांमध्ये शक्य नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या शिक्षण व्यवस्थेने डिजिटल शिक्षणासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, त्यानंतर हे पर्याय स्वीकारले पाहिजेत. - डॉ. नूतन लोहिया, मानसोपचारतज्ज्ञमोबाइल नोटिफिकेशन वाचण्यात होतोय ‘टाइमपास’!‘आॅनलाइन’ क्लासचे कौतुक सुरुवातीचे दोन दिवस मुलांनी केले असले तरी त्यानंतर मात्र घरात समोर लॅपटॉप, मॉनिटर किंवा मोबाइल घेऊन बसायचे आणि कानाला हेडफोन लावून शिक्षकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यात फारसा रस नसल्याचे दृष्टीस पडत आहे. अधूनमधून मोबाइलमध्ये फेसबुक, ट्विट अथवा इन्स्टाग्रामवर आलेले मेसेज किंवा व्हिडीओचे नोटिफिकेशनही मुले पाहत बसतात. शिकवण्याकडे त्यांचे लक्ष राहत नाही. मूल अभ्यासच करतंय की आणखी काही अशी दुगदुग पालकांच्या मनाला सतत असल्याने काम बाजूला ठेवून क्लास संपेपर्यंत सतत मुलांसोबतच राहावे लागतेय.
शांतता! ऑनलाइन शाळा सुरू आहे! मुलं शोधतायेत क्लास बंक करण्याचा बहाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 3:55 AM