Join us

स्वातंत्र्यानंतर प्रथमच गडचिरोलीत शांततेत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:07 AM

गृहमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलदृष्ट्या दुर्गम-अतिदुर्गम व नक्षलबहुल आदिवासी भागात यापूर्वी नक्षलवाद्यांच्या दहशतीने ...

गृहमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलदृष्ट्या दुर्गम-अतिदुर्गम व नक्षलबहुल आदिवासी भागात यापूर्वी नक्षलवाद्यांच्या दहशतीने ग्रामपंचायत मतदान झाले नव्हते. अशा मौजा जवेली बुद्रूक गावात ५४ वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली. नक्षलवाद्यांच्या भीतीला न जुमानता लोकांनी मतदान केले. विशेष म्हणजे मतदान शांततेत पार पडले. त्यासाठी पाेलिसांनी घेतलेल्या खबरदारीची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली. पोलीस विभागाची ही कामगिरी मान उंचावणारी आहे, अशा शब्दात त्यांनी त्यांचे कौतुक केले.

गडचिरोली हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून परिचित आहे. येथे १५ व २० जानेवारी या दोन टप्प्यात निवडणुका झाल्या. जनतेने नक्षलवाद्यांच्या धमक्यांना व त्यांच्या दहशतीला न जुमानता, त्यांच्या आमिषाला बळी न पडता मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्या टप्प्यात ८२.०६ टक्के व दुसऱ्या टप्प्यात ८०.०१ टक्के मतदान झाले. त्यामध्ये ८१.१९ टक्के महिलांनी, तर ७४.३७ टक्के पुरुषांनी मतदान केले.

गडचिरोली पोलीस दलाने नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील १७७ व संवेदनशील ३७७ तसेच सामान्य ५२७ अशा अतिदुर्गम भागातील निवडणूक बूथवर मतदान प्रक्रियेचे साहित्य, मतदान प्रक्रियेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना जंगलातून वाट काढून पहिल्या टप्प्यातील १८१ निवडणूक बूथवर ११६८ किलोमीटर अंतर पार करत तसेच दुसऱ्या टप्प्यातील १८६ निवडणूक बूथवर १९७८ किलोमीटरचा पायी प्रवास पार करून आणि १२२ अतिसंवेदनशील बूथवर हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितपणे पोहोचविले. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू न देता मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली.