मोरांचा अधिवास भटके श्वान, मांजर व मुंगसांमुळे धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 02:15 AM2020-02-06T02:15:32+5:302020-02-06T02:15:55+5:30
अधिकारी, कर्मचारी घेत आहेत काळजी
मुंबई : राजभवनात मोरांचा वावर आहे. सध्या राजभवनात सुमारे १५ मोर व लांडोर आहेत. राजभवनातील मोरांचा अधिवास भटके श्वान आणि मांजर, तसेच मुंगसांमुळे धोक्यात आला आहे.
राजभवनाच्या परिसरात मोराची आठ पिल्ले जन्माला आली होती. त्यातील सहा पिल्लांना श्वान, मांजर व मुंगसाने मारले. त्यातील दोन पिल्ले जगली असून, ती सध्या राजभवनाच्या मयूर विहारामधील पिंजऱ्यात सुखरूप आहेत. त्यातील एक पिल्लू मोर आहे. श्वान, मांजर व मुंगूस यांच्यापासून पिल्लाला दूर ठेवण्यासाठी एका पिल्लाला राजभवनातील कर्मचारी सदा भोसले यांनी घरी नेले आणि दुसरे पिल्लू परळ येथील बैल-घोडा रुग्णालयात लहानाचे मोठे झाले. बंदिस्त असलेल्या पिल्लांना उडण्याची कला अवगत नाही. आता ही पिल्ले बाहेर सोडली, तर त्यांना बाहेरील मोर स्वीकारत नाहीत, अशी माहिती राजभवनाचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी दिली.
समुद्राच्या किनारपट्टीवरील भटके श्वान अन्नाच्या शोधात राजभवनात शिरतात आणि मोर व लांडोरांवर हल्ला करून त्यांना मारतात. त्यामुळे या प्राण्यांपासून मोरांचे संरक्षण कसे करावे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राजभवनातील अधिकारी व कर्मचारी मोरांसाठी दररोज खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. मोरांची संख्या कमी असून, लांडोरांची संख्या जास्त आहे. राजभवनाचा परिसर हा मोरांसाठी एक मुक्त विहार आहे. संरक्षक भिंत बांधण्याची एका संस्थेची संकल्पना होती, परंतु त्या संरक्षक भिंतीचाही काही उपयोग झाला नाही. श्वान, मांजर व मुंगूस हे संरक्षक भिंत पार करून राजभवनात वावरत असतात, असेही काशीकरांनी सांगितले.
मादीला अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागेचा अभाव
प्रजनन काळात लांडोर ही सुरक्षित ठिकाणी अंडी घालण्यासाठी जागा शोधत असते. अशा वेळी मादी ही घराच्या किंवा इमारतीच्या खिडकीवरील मोकळ्या जागेत अंडी घालते, तसेच एखादा कोपरा पाहून त्या ठिकाणी अंडी घालते. अशा उंच ठिकाणी अंडी घातल्यामुळे ती जमिनीवर पडण्याची भीती सर्वाधिक असते.