Join us

मुंबई विमानतळावर उच्चांक, जूनमध्ये 42 लाख प्रवाशांचे ‘टेकऑफ’ अन् ‘लँडिंग’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 8:51 AM

 मुंबईतून मध्य-पूर्वेतील देशांत सर्वाधिक प्रवास केला आहे. त्यांची टक्केवारी ३६ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईविमानतळावरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, जूनमध्ये तब्बल ४२ लाख जणांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली. तसेच जूनमध्ये विमान वाहतुकीमध्येही ३३ टक्के वाढीची नोंद झाली. जून २०१९ मध्ये कोविड काळानंतर विमान प्रवास थंडावला होता. आता मात्र पुन्हा विमान प्रवासाने गती पकडली असून, जून २०१९ च्या तुलनेत यंदा तब्बल १०७ टक्के अधिक प्रवासी संख्येची नोंद झाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, देशाच्या अन्य भागातून, तसेच परदेशातून मुंबईत आलेल्या प्रवाशांची संख्या ही २० लाख १४ हजार इतकी आहे. मुंबईतून उड्डाण केलेल्या प्रवाशांची संख्या ही २० लाख ४ हजार इतकी आहे. या प्रवासी संख्येत आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येतही गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३९ टक्के वाढ नोंदली गेली आहे. सुमारे १० लाख १५ हजार प्रवाशांनी मुंबईतून परदेशात उड्डाण केले, तर ३० लाख चार हजार प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केल्याचे दिसून आले.

 मुंबईतून मध्य-पूर्वेतील देशांत सर्वाधिक प्रवास केला आहे. त्यांची टक्केवारी ३६ आहे. त्यानंतर २२ टक्के प्रवाशांनी ऑस्ट्रेलियाला प्राधान्य दिले आहे. युरोपात जाणाऱ्या प्रवाशांची टक्केवारी १८ इतकी होती, तर उत्तर अमेरिकेत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या १६ टक्के व आफ्रिकेत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आठ टक्के इतकी होती. या विविध देशांत जाण्यासाठी विमान कंपन्यांच्या वाहतुकीतही ३३ टक्के वाढ झाली आहे. 

 एकूण ६०२८ विमानांनी मुंबईतून आंतरराष्ट्रीय पातळीवर उड्डाण केले.

टॅग्स :विमानतळमुंबई