वाटाणा मोडणार सर्वसामान्यांचे कंबरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:48 AM2017-07-21T03:48:09+5:302017-07-21T03:48:09+5:30
टोमॅटोनंतर आता हिरव्या वाटाण्याने सर्वसामान्य मुंबईकरांसह गृहिणींचे कंबरडे मोडले आहे. कारण हिरव्या वाटाण्याच्या दराने मुंबईतील जवळपास सर्वच किरकोळ
सागर नेवरेकर । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टोमॅटोनंतर आता हिरव्या वाटाण्याने सर्वसामान्य मुंबईकरांसह गृहिणींचे कंबरडे मोडले आहे. कारण हिरव्या वाटाण्याच्या दराने मुंबईतील जवळपास सर्वच किरकोळ बाजारपेठांमध्ये शंभरीचा टप्पा गाठला आहे. तर घाऊक बाजारामध्ये हिरवा वाटणा किलोमागे ८० ते ९० रुपये इतक्या दराने विकला जात आहे.
महागाईने सर्वसामान्य मुंबईकर त्रस्त झालेले असताना टोमॅटोपाठोपाठ आता हिरव्या वाटाण्यात झालेल्या दरवाढीने त्यात आणखी भर टाकली आहे. सर्वसाधारणपणे भाज्यांचे दर हे श्रावण महिन्यात वाढत असतात. मात्र या वेळेस जूनपासूनच भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. लांबलेल्या पावसामुळे दरात वाढ झाल्याचे कारण व्यापाऱ्यांकडून देण्यात येत आहे. दरम्यान, बाजारात वाटाण्याची टंचाई निर्माण झाल्याने कर्नाटक राज्यातील कोलारवरून त्याची आयात केली जात आहे. या वाटाण्याला ७० ते ८० रुपये इतका दर मुंबईच्या बाजारात मिळत आहे. या वाटाण्यासह कोबी आणि मिरची कर्नाटक व आंध्र प्रदेशातून आयात केली जात आहे, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि घाऊक व्यापारी शंकर पिंगळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
हिरव्या वाटाण्याचे दर
मालाड - ८० ते १०० रुपये किलो
दादर - १०० रुपये किलो
लोअर परळ - ८० रुपये किलो
मानखुर्द - १२० रुपये किलो
कुर्ला - १२० रुपये किलो.
हिवाळ्यात वाटाण्याचा सीझन असतो. आमच्याकडे हिरवा वाटाणा वाशीवरून येतो. आता बाजारात हिरवा वाटाणा यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सुरुवातीला वाटाण्याच्या किमती जास्त आहेत.
- ललकेश्वर गुप्ता, भाजी व्यापारी, दादर
काही दिवसांपूर्वी कांदे महाग झाले होते. आता टोमॅटो आणि हिरव्या वाटाण्याचे भाव वाढले आहेत. श्रावण महिन्यात भाज्या अजून महाग होतील. सामान्य माणसाने भाज्या खाव्यात की नाही हा मोठा प्रश्न पडत आहे. भाव वाढल्याचा शेतकरी बांधवांना फायदाही होत नाही. सामान्य नागरिक आणि शेतकरी या दोघांचा विचार करून भाज्यांचे दर ठरविले पाहिजेत.
- अस्मिता परब,
गृहिणी, कांदिवली
भाज्यांचे दर असेच वाढले तर सर्वसामान्यांच्या ताटातून भाजी हद्दपार होईल. रोजच्या भाजीचे पैसे ठरलेले असतात. त्यामुळे भाज्यांची किंमत वाढत गेली तर इतर गोष्टी आणायला पैसे उरत नाहीत.
- राजेश्री जाधव,
गृहिणी, गोरेगाव