Join us

'एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ', राजू शेट्टींनी मांडली अवकाळीग्रस्तांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 5:13 PM

शेतकरी आता कुठेतरी सावरत असतांना गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे.

राज्यात एकीकडे अवकाळीमुळे शेतकऱ्यांची वाताहात झाली असताना मुख्यमंत्र्यांसह अख्ख मंत्रिमंडळ अयोध्या दौऱ्यावर गेल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर धरलं आहे. बहुचर्चित आयोद्धा दौरा करून मुंबईत परतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवारी तातडीने अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या परस्थितीची पाहाणी करण्यासाठी नाशिक जिल्हा दौऱ्यावर गेले आहेत. रविवारी झालेला मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच, शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केलीय. एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ झाल्याचं शेट्टींनी म्हटलंय. 

शेतकरी आता कुठेतरी सावरत असतांना गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. रविवारी अनेक जिल्ह्यात झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर असून सटाणा तालुक्यातील काही गावांना ते भेट देणार आहेत. मुंबईतून थेट हेलिकॉप्टरने ते सटाणा येथे पोहचले. दुसरीकडे खासदार राजू शेट्टी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथाच मांडली आहे. तसेच, प्रभू रामांच दर्शन खुशाल घ्या, पण रामराज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या नुकसानीकडेही लक्ष द्या, अशी मागणी शेट्टी यांनी केलीय. 

अवकाळी आणि गारपीटीमुळे राज्यात कांदा, द्राक्षे, पेरु, भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झालंय. खरंतर, तळाहाताच्या फोडासारखं शेतकरी आपलं पीक जपतो, पण निसर्गापुढे त्याचं काहीही चालत नाही. एका फटक्यात होत्याचं नव्हतं होतं. आज एकनाथांच्या राज्यात माझा शेतकरी अनाथ झाला आहे, असे म्हणत शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष वेधले आहे. 

मुख्यमंत्र्यांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घ्यायचे तर त्यांनी खुशाल घ्यावे. मात्र, राज्याच्या प्रमुखाला व्यक्तिगत निर्णयापेक्षा सर्वांसाठी कर्तव्य श्रेष्ठ असतात. प्रभू रामचंद्रांनीही प्रजेला तळहातातील फोडासारखं जपलं म्हणून जनता आजही म्हणतेय रामाचं राज्य आलं पाहिजे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, असे म्हणत राजू शेट्टी यांनी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडली. तसेच, या शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहनही केलंय.  

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबईपाऊसनाशिकराजू शेट्टी