दादर स्थानकातील पादचारी पूल आजपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 01:26 AM2019-05-15T01:26:08+5:302019-05-15T01:26:17+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर स्थानकातील चर्चगेट दिशेकडील दुसरा पादचारी पूल सुरक्षेच्या कारणास्तव १४ मे रोजी रात्रीच्या वेळी बंद केला आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर स्थानकातील चर्चगेट दिशेकडील दुसरा पादचारी पूल सुरक्षेच्या कारणास्तव १४ मे रोजी रात्रीच्या वेळी बंद केला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना पायपीट करून अन्य पुलांचा वापर करावा लागेल.
दादर स्थानकाच्या पश्चिम दिशेकडे फुल बाजार आहे. यासह इतर मोठे बाजार आहेत. त्यामुळे या पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. बंद केलेला पादचारी पूल मध्यवर्ती मोठ्या पादचारी पुलाचा जोडपूल आहे. त्यामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर जाण्यासाठी उर्वरित पुलांचा वापर करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
दादर स्थानकातील पादचारी पूल बंद करून त्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वसई रोड स्थानकावरील फलाट क्रमांक ६ आणि ७ वरील मध्यवर्ती पादचारी पुलाचा उत्तरेकडील जिना १४ ते २९ मेदरम्यान बंद करण्यात येणार आहे. या कालावधीत जिन्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
दुरुस्तीसाठी पूल बंद राहणार असल्याने आता प्रवाशांना येथून प्रवास करताना अधिकचा वळसा घालत येथील पर्यायी पुलांचा वापर करावा लागेल. एक पूल बंद झाल्यामुळे इतर पुलांवरील गर्दी वाढण्याची शक्यता आहे.