Join us

गोराई खाडीचा पादचारी पूल झाला निसरडा, उपाय-योजनेची मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: July 05, 2024 6:22 PM

फेरीबोट पकडण्यासाठी दुचाकीस्वार, रिक्षा चालक या खाडीच्या रस्त्याचा वापर करून गोरई गावात पलीकडे जातात.

मुंबई -बोरिवली पश्चिम गोराई खाडी येथील जेट्टीवरील रहदारीच्या भागात भरती-ओहोटीनंतर  समुद्रातील सर्व कचरा येथील पादचारी पूलावर येऊन पसरतो. परिणामी गोराई खाडीचा पादचारी पूल खूप निसरडा झाला आहे. या रस्त्यावरून चालणे खरोखर खूप कठीण आहे.

फेरीबोट पकडण्यासाठी दुचाकीस्वार, रिक्षा चालक या खाडीच्या रस्त्याचा वापर करून गोरई गावात पलीकडे जातात. या निसरड्या पादचारी पूलावरून गोराई गावातून मासे विक्री व भाजी विक्री करणाऱ्या महिला तसेच गोराई गाव, मनोरी, कुलवेम, उत्तन या गावांमधील नागरिक, रोजंदारीवर जाणारे कर्मचारी, शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आदी रोज ये जा करतात.

गोराई गाव हे प्रेक्षणीय पर्यटन क्षेत्र असल्याने जगभरातील नागरिक पॅगोडा, वॉटर किंगडम ,आणि गोराई बीचला भेट देण्यासाठी येतात.त्यांना या पादचारी पूलावरून  फेरीबोटी पर्यंत जाणे व येणे अवघड झाले असून येथे साचलेला गाळ व शेवाळामुळे सदर पादचारी पूलाचा रस्ता खूप निसरडा झालेला आहे, अशी माहिती माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी दिली.

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड व पालिका प्रशासनाने यावर गांभीर्याने लक्ष देवून ठोस उपाय-योजना करावी, नाही तर येथे अपघातांचे प्रमाण वाढू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :मुंबई