सांताक्रुझ रेल्वेस्थानकातील पादचारी पूल धोकादायक!, तडे गेलेल्या पुलावरून जीवघेणा प्रवास, मूलभूत सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 04:47 AM2017-10-20T04:47:57+5:302017-10-20T04:48:33+5:30

सांताक्रुझ रेल्वेस्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. येथील फलाटांची रुंदी खूप कमी असल्याने फलाटावर सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी होते. वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी पुलाची रुंदी वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

The pedestrian bridge at Santacruz railway station is dangerous!, The fatal travel on the bridge, the lack of basic amenities | सांताक्रुझ रेल्वेस्थानकातील पादचारी पूल धोकादायक!, तडे गेलेल्या पुलावरून जीवघेणा प्रवास, मूलभूत सुविधांचा अभाव

सांताक्रुझ रेल्वेस्थानकातील पादचारी पूल धोकादायक!, तडे गेलेल्या पुलावरून जीवघेणा प्रवास, मूलभूत सुविधांचा अभाव

Next

- सागर नेवरेकर
मुंबई : सांताक्रुझ रेल्वेस्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. येथील फलाटांची रुंदी खूप कमी असल्याने फलाटावर सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी होते. वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी पुलाची रुंदी वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. त्यातच सांताक्रुझ पूर्व आणि पश्चिमेला जोडणा-या पादचारी पुलाची अवस्था बिकट आहे. हा पूल ५० वर्षांपूर्वीचा असल्याने जीर्ण झाला आहे. पुलाला भेगा पडल्या आहेत. कधीही कोसळेल, अशा स्थितीत असलेल्या या पुलावरून दररोज हजारो प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.
सांताक्रुझ स्थानकावरील पुलाप्रमाणेच फलाटाचीही अवस्था दयनीय आहे. बोरीवली दिशेकडील फलाटावर छप्पर नाही. त्यामुळे प्रवाशांना पाऊस, उन्हाळ््यात प्रवास करताना त्रास सहन करावा लागतो. पूर्वेला एक तिकीटघर आहे. तेथे सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या रांगा लागतात. पश्चिमेला दोन तिकीटघरांची व्यवस्था असून, स्थानकावरील तिकीटघर परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे.
सांताक्रुझ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाºया पादचारी पुलावरून प्रवास करणाºयांची संख्या अधिक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार, पूर्वेकडील वाकोला मार्केटपर्यंतचे नागरिक व अन्य प्रवासी मिळून जवळपास ३३ टक्के लोक पूर्वेला बस पकडण्यासाठी सांताक्रुझ स्थानकावरील पुलाचा वापर करतात. पुलाला स्कायवॉक जोडला गेल्याने, या पुलाचा वापर करणाºयांच्या संख्येत भर पडत आहे.
सातत्याने या पुलाच्या डागडुजीसाठी पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. गर्दीचे नियोजन तसेच प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन तोकडे पडत असल्याने एल्फिन्स्टनसारखी दुर्घटना घडण्याची भीती नाकारता येत नाही.

फेरीवालामुक्त स्कायवॉक
मनसेने फेरीवाल्यांविरुद्ध केलेल्या कारवाईनंतर सांताक्रुझ स्कायवॉकवरील फेरीवाल्यांना उठविण्यात आले. त्यामुळे आता हा स्कायवॉक हा फेरीवालामुक्त झाला आहे.

सरकत्या जिन्यांचा अभाव
स्थानकावर सरकत्या जिन्यांची सोय नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पुलावरून ये-जा करण्यास त्रास होतो. रेल्वे प्रशासनाने सरकत्या जिन्यांची लवकरच व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

एटीव्हीएम बंद
पूर्व आणि पश्चिमेकडील तिकीटघराशेजारी एटीव्हीएम आहेत. मात्र, या मशिन बंद असतात. त्यामुळे तिकीटघरांवर सकाळ, संध्याकाळ प्रवाशांची लांबलचक रांग लागलेली असते.

गर्दीचे नियोजन करावे
सांताक्रुझला कामानिमित्त येणे-जाणे असते. फलाटांची रुंदी कमी असल्याने सकाळ-संध्याकाळ, तसेच गाड्या विलंबाने धावत असल्यास गर्दीमुळे फलाटावर पाय ठेवायलाही जागा नसते. रेल्वे प्रशासनाने गर्दीचे नियोजन करणे गरजेचे आहे.
- वैभव कोलगे, प्रवासी

मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष
स्थानकावर सकाळी गाडीत पाय ठेवायला जागा नसते. सांताक्रुझ स्थानकावर सोयी-सुविधांचा अभाव आहे. तिकिटांचे दर वाढत असतात; परंतु प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जाते.
- सचिन जाधव, प्रवासी

स्कायवॉकचे काम लवकरच सुरू करणार
पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पादचारी पूल ५० वर्षांपूर्वीचा आहे. दोन वर्षांपूर्वी या पुलाचा पत्रा खाली पडून रेल्वेवर आदळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पुलाला भेगा पडल्या आहेत. पूर्वेकडील स्कायवॉक हा हायवेपर्यंत आहे. आता तो हायवेपासून ते वाकोला पुलापर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव आहे. स्कायवॉकला सरकते जिने लावले जाणार आहेत. पत्रव्यवहार सुरू आहे. आम्ही लवकरच स्कायवॉकचे काम सुरू करणार आहोत.
- सदा परब, नगरसेवक

Web Title: The pedestrian bridge at Santacruz railway station is dangerous!, The fatal travel on the bridge, the lack of basic amenities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.