मुंबई: कांदिवली पश्चिमच्या महावीर नगरमध्ये राहणारे संदीप डावरे (३२) हे त्यांचा मित्र अल्ताफ शेख याच्या ४ वर्षीय पुतणी मेहेरला आणायला बोरिवली पश्चिमच्या हिमालया स्कूलमध्ये निघाले होते. त्यांनी मुलीला घेतल्यावर पायी चालत ते साईबाबा नगर प्रताप आदिनाथ बिल्डिंग याठिकाणी पोहोचले. त्यावेळी अचानक बिल्डींगमधून साधारण तीन फूट लांबीची एक लोखंडी सळी त्यांच्या डोक्यात पडली आणि ते गंभीर जखमी झाले. तर त्यांच्या सोबत असलेली मेहेर ही थोडक्यात बचावली.
डावरे यांनी वर पाहिल्यावर त्या इमारतीचे काम सुरू होते आणि त्यासाठी आवश्यक असलेली संरक्षक जाळीही लावण्यात आली नव्हती. तसेच बांधकामाचीही कोणतीच सूचना देणारा फलक तिथे नव्हता. परिणामी डावरे यांनी शताब्दी रुग्णालयात उपचार घेतल्यावर त्यांच्या डोक्याला टाके पडले आणि नंतर त्यांनी या विरोधात बोरिवली पोलिसांकडे संबंधित बांधकाम कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करवला.