Join us

पादचारी, रोड ओव्हर पुलांच्या सुरक्षा अहवालाची प्रतीक्षा, माहिती अधिकारात उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 4:27 AM

ऑगस्ट, २०१८ ते मार्च, २०१९ या कालावधीत १९१ पादचारी पूल आणि ८९ रोड ओव्हर पुलांची सुरक्षा ऑडिट आयआयटी मुंबईतर्फे करण्यात आले आहे. मात्र, या २८० पुलांचा सुरक्षा अहवालच अजून आलेला नाही.

मुंबई : ऑगस्ट, २०१८ ते मार्च, २०१९ या कालावधीत १९१ पादचारी पूल आणि ८९ रोड ओव्हर पुलांची सुरक्षा ऑडिट आयआयटी मुंबईतर्फे करण्यात आले आहे. मात्र, या २८० पुलांचा सुरक्षा अहवालच अजून आलेला नाही. या पादचारी पूल आणि रोड ओव्हर पुलांच्या सुरक्षा ऑडिटवर ३ कोटी ३७ लाख ८०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. या कामासाठी १ कोटी ६८ लाख ५० हजार ४०० रुपये आगाऊ देण्यात आले. मात्र, ५० टक्के रक्कम देऊनसुद्धा सुरक्षा अहवाल रेल्वेला देण्यात आला नाही, अशी माहिती अधिकाराखाली माहिती मिळाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पादचारी पूल आणि रोड ओव्हर पुलांच्या सुरक्षा ऑडिटची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मागितली. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल आणि रोड ओव्हर पूल सामान्य सुरक्षा ऑडिट बाह्य एजन्सीला दिली जात नाही, असे गलगली यांना सांगण्यात आले. विविध अभियंत्यांच्या निश्चित केलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून मध्य रेल्वेमार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि त्यानंतर पादचारी पूल आणि रोड ओव्हर पुलांच्या सुरक्षा ऑडिट केले जाते. या पुलांचे ऑडिट आयआयटीकडून करण्यात येत आहे. मात्र, सुरक्षा अहवाल अद्याप आलेला नाही. 

‘ऑनलाइन पद्धतीचा वापर गरजेचा’पादचारी पूल आणि रोड ओव्हर पुलांची संख्या २८० असून, आयआयटी मुंबईने टप्प्याटप्प्याने सुरक्षा अहवाल देणे अत्यावश्यक आहे. यासह सामान्य प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आवश्यक सुरक्षा ऑडिटवर पैसे खर्च होतात. मात्र, सुरक्षा अहवाल वेळेत प्राप्त होत नाही. सुरक्षा अहवालाची माहिती सार्वजनिक करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यात यावा, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली.

टॅग्स :मुंबईमाहिती अधिकार कार्यकर्ता