Join us

तिसऱ्या लाटेसाठी बालरोगतज्ज्ञ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबईतील संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून खाटांच्या उपलब्धतेपासून ते टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे लहानग्यांना ...

मुंबई : मुंबईतील संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून खाटांच्या उपलब्धतेपासून ते टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे लहानग्यांना होणारा कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन कंबर कसत आहे.

देशभरात लहानग्यांमध्ये आतापर्यंत असलेला २० वयोगटाहून खालील गटातील मुलांना कोरोना संसर्गाचे प्रमाण २० टक्क्यांहून कमी असल्याचे दिसून आले आहे, तर मृत्यूदर ३ टक्के असल्याची नोंद होती. परंतु, वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविलेला तिसऱ्या लाटेतील लहानग्यांना असणारा धोका लक्षात घेऊन शहर उपनगरातील कोविड केंद्रांत व रुग्णालयांत खाटांची उपलब्धता करण्याचे व्यवस्थापन सुरु आहे.

तसेच शहर उपनगरातील खासगी बालरोगतज्ज्ञांनाही प्रशिक्षण देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईत ० ते ९ वयोगटातील ४५ टक्के मुलींना कोरोनाचा संसर्ग तर ५५ टक्के मुलांना लागण झालेली दिसून आली. या गटातील रुग्णसंख्या १२ हजार १९६ आहे, तर आतपर्यंत २६ मृत्यू झाले आहेत. १० ते १९ वयोगटात ३१ हजार २९६ मुला- मुलींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात मुलांचे प्रमाण ५६ टक्के तर मुलींचे प्रमाण ४४ टक्के इतके आहे. तर आतापर्यंत या वयोगटातील ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत वरळी येथे पालिकेच्या माध्यमातून ५०० खाटांचे जम्बो कोविड केंद्र उभारण्यात येणार आहे. यात एक वर्षापासून ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना दाखल केले जाणार आहे. या लहान मुलांबरोबर आई असणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन क्युबिकल पद्धतीने या जम्बो केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. यात ७० टक्के ऑक्सिजन खाटा असतील तर २०० अतिदक्षता विभागातील खाटा असणार आहेत.

मुंबईतील एकूण रूग्ण

बरे झालेले रूग्ण - ६,६१,२२६

उपचार घेत असलेले रूग्ण - २७,३२२

१० वर्षांपेक्षा कमी वयाचे रूग्ण - १२,१९६

११ ते १९ वर्षे वयोगटातील रूग्ण - ३१,२९६

खासगी डॉक्टरांचीही मदत घेणार

- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका प्रशासन

तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून शहर उपनगरातील खासगी डॉक्टरांचीही मदत घेण्यात येते. झोपडपट्टीच्या वस्तीत आणि चाळींच्या परिसरातील बालरोगतज्ज्ञांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लहानग्यांनी फ्लूची लस घेण्याबाबत बालरोगतज्ज्ञांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.