पेण-पनवेल मेमू उद्यापासून धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 06:56 AM2018-11-10T06:56:21+5:302018-11-10T06:57:10+5:30
मध्य रेल्वेचा दुर्लक्षित प्रवासी मार्ग असलेल्या दिवा-वसई रोड आणि दिवा-पनवेल-रोहा मार्गावरील प्रवाशांना येत्या रविवारीपासून दिलासा मिळणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वेचा दुर्लक्षित प्रवासी मार्ग असलेल्या दिवा-वसई रोड आणि दिवा-पनवेल-रोहा मार्गावरील प्रवाशांना येत्या रविवारीपासून दिलासा मिळणार आहे. रविवार, ११ नोव्हेंबरपासून पेण-पनवेल मार्गावर मेमू लोकल धावणार आहे.
पेण येथून रविवारी अकरा वाजता सुटणारी मेमू पनवेल येथे ११ वाजून ५५ मिनिटांनी पोहचणार आहे. ही मेमू हमरापूर, जिते, आप्टा, रसायनी, सोमाठाणे या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. खारकोपर येथे होणाऱ्या संभाव्य कार्यक्रमात व्हिडीओ लिंकच्या माध्यमाने पेण-पनवेल मेमूला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला रेल्वेमंत्री पीयूष गोयल उपस्थित राहण्याची शक्यता रेल्वे अधिकाºयांनी वर्तवली आहे.
दिवा-वसई रोड आणि दिवा-पनवेल-रोहा मार्गावर देखील मेमू धावणार आहे. १२ बोगींची मेमू या मार्गावर मार्गस्थ होणार असून, मेमूची देखभाल-दुरुस्तीचे काम कळवा कारशेडमध्ये होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या कोचिंगच्या विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नुकतेच पेण-पनवेल मार्गावरील विद्युतीकरणाचे काम मध्य रेल्वेने यशस्वीपणे पूर्ण केले होते. यावेळी डिझलेवरील डेमू ट्रेनच्या ऐवजी विजेवरील मेमू लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर या मार्गावरुन मेमू लोकल चालवण्यासाठी ११ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.