Join us

कोकण युथ क्लबवर दंडात्मक कारवाई

By admin | Published: April 08, 2015 3:31 AM

महापालिकेची परवानगी न घेता देवनार पालिका वसाहतीतल्या मोकळ्या भूखंडावर महापौर चषक भरविणाऱ्या, या भूखंडावर अवैधपणे भरणी

मुंबई : महापालिकेची परवानगी न घेता देवनार पालिका वसाहतीतल्या मोकळ्या भूखंडावर महापौर चषक भरविणाऱ्या, या भूखंडावर अवैधपणे भरणी घालणाऱ्या कोकण युथ क्लबवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ने क्लबमार्फत सुरू असलेल्या भरणीचे वृत्त आजच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानंतर एम-पूर्व विभागाच्या साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी ही माहिती दिली.स्पर्धा भरविण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही परवानग्या कोकण युथ क्लबकडे नव्हत्या. त्यामुळे क्लबकडून दुप्पट दंड आकारला जाईल. तसेच क्लबने या भूखंडाभोवती घातलेले तात्पुरते कुंपण हटविले जाईल, असे दिघावकर यांनी सांगितले.गेल्या महिन्यात २१-२२ एप्रिलला कोकण युथ क्लबने वसाहतीतल्या स्मशानभूमीसमोरील उद्यानासाठी आरक्षित मोकळया भूखंडावर शूटिंग बॉल महापौर चषक स्पर्धा आयोजित केली होती. त्यासाठी अवघ्या चारेक दिवसांत क्लबने अवैध भरणी घालून सुमारे ८० टक्के भूखंड सपाट केला. स्थानिकांनी तक्रारी केल्यानंतर ही भरणी तात्पुरती थांबली होती.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेचे उद्घाटन महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते होणार होते. त्यांनीच क्लबला या भूखंडावर स्पर्धा भरविण्याची परवानगी द्यावी, असा फोन एम-पूर्व विभागातल्या अधिकाऱ्यांना केला होता. महापौरच पाठीशी असल्याने क्लबला स्पर्धेसाठी आवश्यक त्या परवानग्या घेणे महत्त्वाचे वाटले नसावे, असा अंदाज सूत्र व्यक्त करतात.दरम्यान, आज दिवसभर देवनार पालिका वसाहतीत लोकमतच्या वृत्ताची चर्चा होती. येथील काही संस्था, संघटनांनी लोकमतच्या वृत्ताचे जम्बो झेरॉक्स आपापल्या फलकांवर झळकावले. (प्रतिनिधी)