भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर व कोनार्क विकास आघाडीचे नगरसेवक विलास आर. पाटील यांनी कोंबडपाडा येथील एका जागेच्या विकासाच्या कामासाठी विनापरवानगी गौणखनिजाचे उत्खनन केले म्हणून तहसीलदार वैशाली लंभाते यांनी जमीनमालक अशोक दामोदर कुंटे व विकासक विलास पाटील यांना ५२ लाख ३७ हजार ४०० रुपयांची रॉयल्टी व दंड ठोठावला आहे.शहरातील कोंबडपाडा येथे सर्वे.नं.४१/३,५०/१पै,५०/१,५२/२ या जमिनीवर विकास करताना जमीनमालक अशोक दामोदर कुंटे व इतर, विकासक विलास रघुनाथ पाटील व इतर यांनी ३७४१ब्रास माती या गौण खनिजाचे उत्खनन व साठा केल्याचे मंडळ अधिकारी यांच्या निदर्शनास आले. यासाठी प्रशासनातील कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतलेली नाही. याबाबत खुलासा करण्याकरीता महसूल खात्यामार्फत २५/११/१३ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार संबंधितांनी केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने पुन्हा एकदा बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. तेव्हा त्यांनी वकिलामार्फत खुलासा सादर केला. तो खुलासा अमान्य करीत तहसीलदार वैशाली लंभाते यांनी जमीनमालक अशोक दामोदर कुंटे व विकासक विलास रघुनाथ पाटील यांनी ३७४१ब्रास मातीचे उत्खनन व साठा केल्याप्रकरणी स्वामित्वधन १४ लाख ९६ हजार ४०० रुपये व ४४ लाख ८९ हजार २०० रुपये दंड असा एकूण ५२ लाख ३७ हजार ४०० रुपयांची दंडनीय रक्कम भरण्याची नोटीस बजावली आहे. १५ दिवसांत ही रक्कम न भरल्यास त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेतून ती वसूल करण्यात येईल, अशी माहिती महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)
माजी महापौर विलास पाटील यांना दंड
By admin | Published: June 14, 2014 11:54 PM