सरकारी घर न सोडणाऱ्या अधिकाऱ्यांकडून दंडवसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 09:04 AM2021-08-14T09:04:53+5:302021-08-14T09:05:11+5:30
निवृत्ती, बदलीनंतरही सरकारी निवासस्थानांचा मोह सोडवेना
- यदु जोशी
मुंबई : सेवानिवृत्त होऊन महिने लोटले, बदली होऊन काही वर्षे झाली, तरी मुंबईतील विविध भागांत असलेली सरकारी निवासस्थाने सोडण्याचा मोह लहान-मोठ्या अधिकाऱ्यांना होत नाही. त्यातील अनेकांना निवासस्थान रिकामे करण्यासाठी नोटीसही बजावण्यात आल्या, पण ते ठाण मांडून आहेत. आता त्यांच्याकडून दंडासह भाड्यापोटी ९ कोटी रुपये वसूल करण्यात येणार आहे.
ही निवासस्थाने मलबार हिल, चर्चगेट, वांद्रे, पवई आदी भागांमध्ये आहेत. तिथे त्यांना ज्या कालावधीसाठी निवासस्थान देण्यात आले होते तो कालावधी केव्हाच संपला तरी ते हलायला तयार नाहीत. या अधिकाऱ्यांमध्ये आजी-माजी आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील काही अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव राहिलेले आहेत. काही अधिकारी आजही बड्या पदांवर आहेत. त्यांची बदली अन्य विभाग, जिल्ह्यांमध्ये होऊनही त्यांनी मूळ शासकीय निवासस्थान सोडलेले नाही. काही अधिकाऱ्यांनी तर मूळ निवासस्थान कायम ठेवत बदलीच्या ठिकाणीही मोठे शासकीय निवासस्थान मिळविले आहे. आता सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातून, त्यांचा मृत्यू झालेला असल्यास कुटुंब निवृत्ती वेतनातून आणि विद्यमान अधिकाऱ्यांच्या पगारातून दंडासह भाडे वसूल करण्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी काढला.
या रकमा काही लाखांच्या घरात आहेत. ज्यांच्याकडून ५० ते ६० लाख रुपयांची वसुली केली जाईल, असेही काही अधिकारी आहेत. सर्व रक्कम वेतन वा सेवानिवृत्ती वेतनातून कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निवासस्थाने न सोडणाऱ्या आजी-माजी अधिकाऱ्यांची नावे
के. पी. बक्षी, श्रीकांत सिंह, डॉ. उषा यादव, मोहम्मद अक्रम सईद, केशव इरप्पा, सुनील सोवितकर, शिरीष मोरे, राजेश नार्वेकर, अमिताभ गुप्ता, अमितेशकुमार, सतीश सोनी, प्रशांत साळी, सुरेश पांडे, सुधीर श्रीवास्तव, अमिताभ जोशी, दिलीप शिंदे, शांतिलाल भोई, अभय यावलकर, चंद्रचूड गोंगले, शरद धर्मा पाटील, विजय सावंत, अनिल पगार, बळीराम चव्हाण, सुरेश पेडगावकर, दत्ताराम कुंभार, ज्योती भोसले, चंद्रकांत शिखरे, ज्योतिबा बागडी, दिगंबर रासम, राजेंद्र घुमरे, मेघना जयतापकर, दीपकसिंह राजपूत, दि. ग्या. गुरव, काशिमशा पटेल, सुबोध तांबे, विकास कांबळे, रंजना रामटेके, मदन जाधव, सुभाष हळदणकर, विलास धुळे, शैलजा तांबे, हसनशा पटेल, संजय मनोहर, वसंत कुडतरकर, सुनील खरात, प्रकाश बोडेकर, सोनल गावडे, महेंद्र कदम, लक्ष्मी गायकवाड, प्रवेश वाघेला, अंबाला सोळंकी, बाळकृष्ण जाधव, रजनीकांत बनाळे, दत्तात्रय गवळी, रंजना हळवणकर, रमेश मयेकर, लक्ष्मी पारपल्ली, ओमवीर वाल्मिकी, सुहास काटे, कमला बहोत, सुलोचना तांबे, मणिलाल वाघेला, रमेश कदम, सुमन लोकरे, प्रमोद कारंडे, हंसा मकवाना, दिप्ती सावंत, दत्ताराम पाटणे, नरेश वैद्य, गेमबहादूर थापा, नटवर सोळंकी, अंबालाल सोळंकी, विजय जाधव, गंगा मकवान, रामचंद्र चव्हाण, शरद भोसले, सत्यनारायण रघुपते, प्रवीण दरेकर, शुभदा शिवेश्र्वकर, चंद्रशेखर जाधव, मीना कोकणे, बाळू शिंदे, मनोहर भावसार, किशोर भालेराव, एस. डी.नार्वेकर, मिलिंद बिर्जे.