नालेसफाईत कामचुकार कंत्राटदाराला ५४.६८ लाखांचा दंड; मनपाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 09:46 AM2024-05-28T09:46:17+5:302024-05-28T09:50:32+5:30
कंत्राटदारांकडून पालिकेने ५४.६८ लाखांचा दंड वसूल केला आहे.
मुंबई : पालिकेकडून नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांना पालिकेकडून दंड केला जात आहे. इर्ला नाला, चामडावाडी नाल्यातून गाळ काढणाऱ्या कंत्राटदाराला अडीच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कंत्राटदारांकडून पालिकेने ५४.६८ लाखांचा दंड वसूल केला आहे.
गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यास मदत होते. यंदा १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट पालिकेने निश्चित केले. कंत्राटदारांकडून नालेसफाई करून गाळाच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवला जात असल्याने अशा कंत्राटदारांवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सर्वाधिक दंड शहर विभागातील कंत्राटदारांना ठोठावण्यात आला आहे.
मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे पालिकेकडून सुरू आहेत. नालेसफाईचे काम १०० टक्के पूर्ण झाले असले तरी संपूर्ण नाल्यातील गाळ काढून तो बाजूला काढणे हे पालिकेचे उद्दिष्ट आहे. - अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
या कारणांमुळे कारवाई-
१) पालिकेतर्फे नालेसफाईला सुरुवात केली असली, तरी नाल्यातून काढलेला गाळ नाल्याच्या कडेला तसेच रस्त्यावर टाकण्यात येत आहे.
२) दुसरीकडे, पादचाऱ्यांना ही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील मोठ्या नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी व तपासणीदरम्यान कंत्राटदारांना दंड ठोठावण्यात आला.