अमोल पाटील, खालापूरखोपोली नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदारांवर मेहरबानी करत तब्बल १ कोटी १५ लाख रु पयांची रॉयल्टी बुडविण्याचा डाव महसूल विभागाच्या जागरूकपणामुळे फसला आहे. खालापूरच्या प्रभारी तहसीलदारांनी या प्रकरणात दंड भरण्याचे आदेश दिल्याने पालिकेच्या कारभाराची लक्तरे निघाली असून ठेकेदाराला फायदा व्हावा म्हणून शासनाचा महसूल बुडविण्याचे काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात मुख्याधिकारी दीपक सावंत संशयाच्या भोवऱ्यात असून नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांच्यानंतर सावंतही यामुळे संकटात सापडले आहेत. खोपोली नगरपालिकेच्या वाढीव पाणी योजनेचे काम सध्या सुरू आहे. योजनेची पाणीसाठवण टाकी उभारण्यासाठी पालिकेच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे. हे उत्खनन करताना रॉयल्टी भरण्यात न आल्याने खालापूर महसूल विभागाने पालिकेला बेकायदा उत्खनन केले म्हणून १ कोटी १५ लाख रु पयांचा दंड केला आहे. यामुळे पालिकेच्या कारभाराची लक्तरेच वेशीवर टांगली गेली आहेत.सदर पाणीसाठवण टाकी बांधण्याचे काम कराड येथील शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन करण्यात आले असून उत्खनन करताना साधी परवानगीही घेण्यात आलेली नाही. अनेक वर्षांपासून खोपोलीची पाणी योजना रखडली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. सदर योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ठेकेदाराला काम करण्यास गती मिळावी, लवकर हे काम पूर्ण व्हावे म्हणून शासनाने रॉयल्टीची रक्कम माफ करावी, असे पत्र मी दिले होते.- दीपक सावंत, मुख्याधिकारी, खोपोली
खोपोली नगरपालिकेला दंड
By admin | Published: July 01, 2015 10:45 PM