Join us  

सुविधा न पुरविणा-या साधना बिल्डरला दंड

By admin | Published: October 12, 2014 11:39 PM

कल्याण येथील साधना कन्स्ट्रक्शन यांनी १९९७ मध्ये स्थानिक प्रशासनाकडून बांधकाम परवानगी घेऊन काटेमानिवली येथे इमारत विकसित केली.

ठाणे : इमारतीतील सदनिकाधारकांना करारनाम्यानुसार सोयीसुविधा, कागदपत्रे न देणाऱ्या तसेच त्यांची सहकारी संस्था स्थापन न करणाऱ्या कल्याणमधील साधना कन्स्ट्रक्शन, बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने १ लाखाचा दंड ठोठावला आहे. याचबरोबर सर्व सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत.कल्याण येथील साधना कन्स्ट्रक्शन यांनी १९९७ मध्ये स्थानिक प्रशासनाकडून बांधकाम परवानगी घेऊन काटेमानिवली येथे इमारत विकसित केली. त्यातील २० सदनिकांची विक्री झाल्यावरही सदनिकाधारकांची सहकारी संस्था स्थापन करून दिली नाही. इमारतीचे पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र, भूखंड हस्तांतरणपत्र प्राप्त केले नाही. इमारतीभोवती कुंपण, मेन गेट बांधणे, स्वतंत्र वीजमीटर, पाण्याची बोअरवेल बसवून देणे यासाठी वारंवार मागणी करूनही डेव्हलपर्सच्या वतीने यापैकी कोणतेच काम झाले नाही. अखेर, साधना डेव्हलपर्सच्या विरोधात श्रीराम-श्याम को-आॅपरेटिव्ह संस्थेने ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करून सर्व बाबींची पूर्तता व्हावी, हस्तांतरणपत्र मिळेपर्यंत प्रतिक्षेत्र ५०० प्रमाणे रक्कम, नुकसानभरपाई ५ लाख व तक्रार खर्च ५० हजार मिळावा, अशा मागण्या केल्या.कागदपत्रे, घटनांची पडताळणी केली असता सदनिकाधारकांनी स्वखर्चाने संस्था स्थापन करून नंतर तक्रार दाखल केली आहे. सर्व बाबींच्या पूर्ततेसाठी संस्थेने डेव्हलपर्सला विनंती तसेच नोटीस दिली होती. मात्र, त्यांनी कोणत्याही बाबींची पूर्तता केली नाही, असे मंचाने स्पष्ट केले. त्यामुळे डेव्हलपर्सने संस्थेला १ लाख नुकसानभरपाई, तीन महिन्यांच्या आत भोगवटा प्रमाणपत्र, भूखंड हस्तांतरणपत्र तसेच इतर सुविधा पुरविण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)