Join us

अनधिकृत पार्किंगसाठी दंड

By admin | Published: June 12, 2015 3:35 AM

ठाण्यातील बहुतेक भागांत आजही रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांची बेकायदा पार्किंग होत आहे. रस्त्यांच्या कडेला गॅरेजवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे

ठाणे : ठाण्यातील बहुतेक भागांत आजही रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांची बेकायदा पार्किंग होत आहे. रस्त्यांच्या कडेला गॅरेजवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. त्याच ठिकाणी वाहन दुरुस्त करणे, विक्री करणे आदी कामे या माध्यमातून होत आहेत. यामुळे शहरातील प्रमुख मार्गांचा श्वास गुदमरू लागला आहे. यामुळे या सर्वांवर कारवाई करून रस्ते, फूटपाथ मोकळे करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, महापालिका आणि वाहतूक पोलीस यावर आता एकत्रितरीत्या कारवाई करणार आहेत. त्यानुसार रस्ते, फूटपाथ अडविणाऱ्या वाहनचालकांना यापुढे ५०० ते २० हजारांपर्यंतचा दंडही भरावा लागणार आहे.शहरातील रस्ते वाढले असले तरीदेखील आजही शहरातील काही प्रमुख मार्गांवर वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. विशेष म्हणजे सर्व्हिस रस्ते तर गॅरेजवाले आणि वाहनांच्या शोरूमवाल्यांसाठी आंदणच दिल्याचे चित्र या भागातून जाताना दिसते. दरम्यान, रस्त्यांच्या कडेला अथवा फूटपाथवर अशा प्रकारे ठाण मांडून बसणाऱ्या अनधिकृत गॅरेज आणि वाहनांवर तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांनी कारवाईचा बडगा उगारून पाच हजारांपर्यंतचा दंड आकारला होता. परंतु, त्यानंतर ही कारवाई थंडावली होती. परंतु, आता पुन्हा पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आता त्यांनी वाहतूक पोलिसांचीही मदत घेण्याचे निश्चित केले असून संयुक्तरीत्या ही कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार, महापालिका हद्दीत रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंग करणाऱ्या व पदपथ, रस्त्यांवर वाहने उभी करून दुरुस्ती व विक्री करणाऱ्यांवर ही कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमध्ये ५०० रुपयांपासून थेट २० हजारांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे. शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी आणि चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असा या मोहिमेमागचा उद्देश आहे. यासंदर्भातील ठराव यापूर्वीच महासभेने केला आहे. या ठरावातील दरानुसार अवजड वाहने, हलकी वाहने, चारचाकी, दुचाकी आदी वाहनांसह सायकल व खेळण्याच्या पाळणा चालकांकडून दंड वसूल होणार आहे.