Join us  

प्रलंबित प्रकल्प मार्गी लागणार?

By admin | Published: May 23, 2014 2:23 AM

मुंबईतील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचे महापौर आणि मुंबईतील सहा नवनिर्वाचित खासदार पंतप्रधान कार्यालयाला भेट देणार आहेत

मुंबई : मुंबईतील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचे महापौर आणि मुंबईतील सहा नवनिर्वाचित खासदार पंतप्रधान कार्यालयाला भेट देणार आहेत. त्यात पंतप्रधानांनी ‘दमणगंगा-पिंजाळ जोड प्रकल्प’ हा ‘राष्ट्रीय प्रकल्प’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी येणार आहे, अशी माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिली. प्रलंबित प्रकल्पांत दमणगंगा पिंजाळ हा राष्ट्रीय प्रकल्प घोषित करण्यासह कोस्टल रोडबाबत आवश्यक त्या पर्यावरणविषयक परवानगी मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवाय मुंबईचे सागरी पर्यावरण सुरक्षित राहावे याकरिता ‘मुंबई मलनि:सारण प्रकल्प’ (एम.एस.डी.पी.) टप्पा क्र. २ च्या प्रलंबित प्रस्तावाचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर पंतप्रधान कार्यालयाच्या स्तरावर भेट घेऊन शहराशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. तसेच त्यानंतर मागण्या मान्य होण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करण्यात येणार आहे. मुंबईतील कमी पडणारे पाण्याचे स्रोत टिकविणे व वाढविणे हे मुंबई शहरापुढील मोठे आव्हान आहे. म्हणूनच दमणगंगा नदीचे पाणी पिंजाळ प्रकल्पात आणण्यासाठी प्रलंबित असलेल्या दमणगंगा-पिंजाळ हा जोड प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे. शिवाय शहरातील वाहतूक समस्येवर एक प्रभावी पर्याय म्हणून नरिमन पॉइंट ते दहिसर दरम्यान कोस्टल रोड बांधणे आवश्यक आहे. मात्र त्याबाबतचा प्रस्ताव पर्यावरणविषयक परवानगीसाठी २०१२ सालापासून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. मात्र सरकार बदलल्यामुळे आता हा प्रस्ताव तातडीने मंजूर होण्यासाठीदेखील या भेटीदरम्यान सविस्तर चर्चा होणार आहे. मुंबईचे सागरी पर्यावरण अधिकाधिक सुरक्षित राहावे व त्याचे संवर्धन करण्यासाठी ‘मुंबई मलनि:सारण प्रकल्प’ (एम.एस.डी.पी.) आखण्यात आला. त्याच्या दुसर्‍या टप्प्यांतर्गत समुद्रात सोडले जाणारे सर्व घटक अत्याधुनिक पद्धतींद्वारे प्रक्रिया करून ते सोडण्यात येणार आहेत. याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियान’ (जेएनएनयूआरएम) यांच्याकडे प्रलंबित आहे. तो मार्गी लावण्यासाठी यावेळी चर्चा केली जाणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले. (प्रतिनिधी)