मुंबई
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पेंग्विन देखभालीवरील कोट्यवधी रुपये खर्च चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधी पक्षाने या खर्चावर आक्षेप घेतल्यानंतर पेंग्विन आणल्यामुळे राणीबागेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. मात्र, २०१७ पासून आतापर्यंत पाच वर्षांत राणी बागेतील खर्च आणि उत्पन्नाचा लेखाजोगा मांडणारे श्वेतपत्रिका जाहीर करण्याचे आव्हान विरोधी पक्षाने केले आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात आणलेल्या पेंग्विनच्या देखभालीसाठी तीन वर्षांत १५ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली होती. मात्र, हा खर्च अनाठायी असल्याचा आरोप करीत या कंत्राटावरच विरोधी पक्षांनी संशय व्यक्त केला होता. भाजप, काँग्रेस आणि मनसेने सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडल्याने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्टीकरण देत पेंग्विनमुळे प्राणीसंग्रहालयाच्या उत्पन्नात १२ कोटींची वाढ झाल्याचा दावा केला होता.
मात्र, यावर आक्षेप घेत प्राणिसंग्रहालयाच्या उत्पन्न आणि खर्चावरील मागील पाच वर्षांपासूनची श्वेतपत्रिका काढण्यात यावी. याची चौकशी करून सविस्तर माहिती देण्याची मागणी आता समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आयुक्तांकडे केली आहे. ६ जुलै २००७ मध्ये राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव पालिकेने मंजूर केला. प्रवेश शुल्क वाढीमुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली नाही, असे प्रशासनाचे मत आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे.
असे आहेत सवाल
पाच वर्षात एकूण किती पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली? पेंग्विनच्या ठिकाणाला एकूण किती पर्यटकांनी भेट दिली. त्यापासून महापालिकेला किती महसूल प्राप्त झाला. तसेच पेंग्विन व्यतिरिक्त प्राणिसंग्रहालयाच्या सुधारणाकरता मागील पाच वर्षांत महापालिकेने किती खर्च केले? एकूण कामांच्या सर्वच निविदा या उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या बांधकामांसाठी अनुकूल नाहीत का? अशी प्रश्नावली आयुक्तांना पाठवण्यात आली आहे.
फेरनिविदा....
सर्व विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे तूर्तास पेंग्विनच्या कक्षाची देखभाल पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. तसेच सुधारित निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.