मुंबई : ज्या दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने मुंबईत बॉम्बस्फोट करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रमुख साक्षीदार, १९९३च्या मुंबई बाॅम्बस्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर सुशोभिकरणासाठी परवानगी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कशी दिली? असा सवाल भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
मैदान, उद्याने, स्मशानभूमी यांचे सुशोभिकरण, देखभाल-दुरुस्ती ही संपूर्ण जबाबदारी मुंबई पालिकेची असते. महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही होता आणि दाऊदचे प्रचारक म्हणून काम करताय? असा टोला लगावतानाच पेंग्विन सेनेच्या युवा अध्यक्षांनी कबर बचाव अभियान सुरू करावे. माझी खुर्ची, माझा परिवार यापलीकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही. पेंग्विन सेना वानखेडे उखडून टाकायला गेली होती ना मग आता ही कबर उखडून दाखवा, असे आव्हानही शेलार यांनी दिले. एका सामान्य शिवसैनिकाला आता मुख्यमंत्रिपद मिळाले. त्यामुळे पेंग्विन सेनेची कोल्हेकुही सुरू आहे. जो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडेल, तोच दसरा मेळावा घेईल. शिवाजी पार्कचे मैदान कुणाला द्यावे? याबाबत नियम नियमावली आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणा निर्णय घेतील. मात्र, ज्याच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सोने आहे, त्यालाच सभा घेता आली पाहिजे, असेही ते म्हणाले.