मनोरंजनापेक्षा पेंग्विनचा जीव मोलाचा

By Admin | Published: October 25, 2016 04:40 AM2016-10-25T04:40:54+5:302016-10-25T04:40:54+5:30

भायखळा येथील राणीच्या बागेत रविवारी झालेल्या पेंग्विनच्या मृत्यूचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. विशेषत: प्राणी आणि पक्षिमित्र संघटनेकडून या प्रकरणी प्राणिसंग्रहालयासह

Penguin's life is more important than entertainment | मनोरंजनापेक्षा पेंग्विनचा जीव मोलाचा

मनोरंजनापेक्षा पेंग्विनचा जीव मोलाचा

googlenewsNext

मुंबई : भायखळा येथील राणीच्या बागेत रविवारी झालेल्या पेंग्विनच्या मृत्यूचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. विशेषत: प्राणी आणि पक्षिमित्र संघटनेकडून या प्रकरणी प्राणिसंग्रहालयासह महापालिकेवर कठोर टीका होत असून, काही पक्षितज्ज्ञांनी तर हे प्राणिसंग्रहालय कायमचे बंद करण्यात यावे, अशी मागणी करत केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे धाव घेतली आहे.
पक्षितज्ज्ञ आनंद सिवा यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, मुळात जेव्हा पेंग्विनला राणीच्या बागेत आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला; तेव्हाच आम्ही निर्णयाला विरोध दर्शवला होता. कारण सध्याचा विचार करता राणीच्या बागेत आताच असलेल्या प्राण्यांसह पक्ष्यांची नीट काळजी घेतली जात नाही. पेंग्विनची काळजी कशी घेणार, असा सवाल आम्ही केला होता. मुळात पेंग्विनला आपल्याकडील वातावरण पोषक नाही.
महत्त्वाचे म्हणजे येथे आणलेले पेंग्विन अद्यापही पर्यटकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आलेले नाहीत. तोवर एकाचा मृत्यू झाला आहे. जर पर्यटकांसाठी पेंग्विनचे दर्शन खुले केले तर त्यांच्यावर किती ताण येईल, याचा विचार न केलेलाच बरा. पेंग्विनच्या मृत्यूची वार्ता समजतात आम्ही केंद्रीय प्राणिसंग्रहालयासोबत संवाद साधला आहे आणि याबाबत योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.
प्लांट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे सचिव सुनीश कुंजू यांनी याबाबत सांगितले की, भायखळा येथील प्राणिसंग्रहालयात झालेल्या पेंग्विनचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. हा मृत्यू केवळ प्राणिसंग्रहालयाच्या दिरंगाईमुळे ओढावला आहे. याविषयीची लेखी तक्रार भायखळा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. पेंग्विनची काळजी घेण्यास जर प्राणिसंग्रहालय असमर्थ होते तर त्यांनी ही जबाबदारी घ्यायला नको होती. उर्वरित पेंग्विनचा असा दुर्देवी अंत होऊ नये. परिणामी ज्या प्रदेशातून हे पेंग्विन आणले होते. त्याठिकाणी ते पुन्हा पाठवण्यात यावे. शिवाय यापुढे कोणताही प्राणी केवळ शोभा म्हणून आणला जाऊ नये.
‘अ‍ॅनिमल मॅटर्स टू मी’चे अध्यक्ष गणेश नायक यांनी सांगितले की, प्राणी संग्रहालयाची शोभा वाढविण्यासाठी जर प्राणी आणायचे असतील तर त्यांची काळजी सुद्धा घेता यायला हवी. प्राणीसंग्रहालयात या आधीही वाघ, पाणघोडा यांचा अंत झाला आहे. भारताचे हवामान पेंग्विनना साजेसे नाही हे माहीत असताना त्याला आणण्याचा अट्टहास करण्यात आला. ३ कोटी खर्चून प्राणी आणला तर त्यासोबत त्या प्राण्याची काळजी घेणारा तज्ज्ञ पाचारण करणे गरजेचे होते. हे पुन्हा घडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. शिवाय शिवसेनेला सुद्धा याबाबतचे पत्र पाठवले आहे. (प्रतिनिधी)

कोणत्याही प्राण्याला पिंजऱ्यात बंद करून ठेवणे वाईटच आहे. राणीच्या बागेत पेंग्विनसाठी तयार करण्यात आलेले वातावरण त्याला कितपत मानवेल हा प्रश्नच होता. उर्वरित पेंग्विनची काळजी घेण्यात यावी.
- काजल जाधव, प्राणिमित्र
पेंग्विन आणण्याऐवजी आहे त्या प्राण्यांकडे लक्ष दिले असते तर त्याचा फायदा झाला असता. अद्यापही वेळ गेलेली नाही. पेंग्विनची काळजी घेतली नाही, तर उर्वरित पेंग्विनचा मृत्यू ओढावण्याची भीती आहे.
- रोहन राणे, प्राणिमित्र

Web Title: Penguin's life is more important than entertainment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.