Join us

चेंबूर परिसरात साथीचे आजार

By admin | Published: March 17, 2016 2:19 AM

अनेक वर्षांपासून सफाई न झाल्याने चेंबूरच्या वाशीनाका परिसरात मोठ्या प्रमाणात नाले तुंबले आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या घाणीमुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे

मुंबई : अनेक वर्षांपासून सफाई न झाल्याने चेंबूरच्या वाशीनाका परिसरात मोठ्या प्रमाणात नाले तुंबले आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या घाणीमुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत स्थानिक नगरसेवकाकडे वारंवार तक्रारी करूनही नगरसेवकाकडून दखल घेतली जात नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे. वाशीनाका येथील म्हाडा वसाहत तसेच गडकरी खाण परिसरातील प्रकाशनगर या ठिकाणी अनेक मोठे नाले आहेत. मात्र पालिकेकडून या नाल्यांची गेल्या अनेक वर्षांत सफाईच झालेली नाही. त्यामुळे हे नाले तुंबल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. सफाई न झाल्याने नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात माती भरली आहे. त्यामुळे सांडपाणी जाण्यास मार्गच नसल्याने दुर्गंधीसह परिसरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सध्या या ठिकाणी मलेरिया आणि डेंग्यूची साथ पसरली आहे. पालिकेने यावर तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. पालिका शहरातील इतर नाले वर्षातून दोन वेळा तरी साफ करते. मात्र या परिसरातील नाल्यांचा फंड मंजूर होऊनदेखील हे नाले साफ करण्यात आलेले नाहीत. याबाबत येथील भाजपाच्या स्थानिक नगरसेवकाला रहिवाशांनी अनेकदा तक्रारी दिल्या आहेत. मात्र नगरसेवक आमच्या समस्यांना केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. नाल्यासोबत रस्ते आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नगरसेवकाकडे तक्रारी करूनही या समस्यांवर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. (प्रतिनिधी)