Join us

बोगस प्रमाणपत्रप्रकरणी दोषी अभियंत्याचे निवृत्तिवेतन थांबवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:06 AM

मुंबई : बोगस पदवी प्रमाणपत्र दाखवून बढती मिळवलेल्या अभियंत्याला बडतर्फ करण्याचे आदेश तत्कालीन पालिका आयुक्तांनी २०१५ मध्ये दिले होते. ...

मुंबई : बोगस पदवी प्रमाणपत्र दाखवून बढती मिळवलेल्या अभियंत्याला बडतर्फ करण्याचे आदेश तत्कालीन पालिका आयुक्तांनी २०१५ मध्ये दिले होते. हा निर्णय रोखून धरत बडतर्फ करण्याऐवजी पदानवत करण्याचा निर्णय महासभेमध्ये घेण्यात आला. मात्र पाच वर्षांच्या कालावधीत कोणतीही कारवाई न झाल्याने हा अभियंता कार्यकारी अभियंता पदावरून निवृत्तही झाला. त्यामुळे या अभियंत्याचे निवृत्तिवेतन कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

पर्जन्य जलवाहिनी विभागात उपप्रमुख अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने कार्यकारी अभियंतापदी बढती मिळवण्यासाठी बुंदेलखंड विद्यापीठाचे बोगस प्रमाणपत्र सादर केले होते. ही बाब समोर आल्यानंतर मे २०१४ मध्ये संबंधित अभियंत्याला निलंबित करून खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीत संबंधित अभियंता दोषी आढळल्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी त्याला बडतर्फ केले. मात्र पालिका महासभेने त्यांना पदावनत करण्यात यावे असा निर्णय घेतला. परंतु त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या दिरंगाईमुळे कोणतीही शिक्षा न होता हा अभियंता कार्यकारी अभियंता पदावरून २०१९ मध्ये निवृत्त झाला. मात्र पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी गंभीर दखल घेत संबंधित अभियंत्याचे संपूर्ण निवृत्तिवेतन रद्द करावे. तसेच २९ मे २०१४ ते ३० एप्रिल २०१९ पर्यंतचा निलंबन कालावधी रद्द न करण्याचे आदेश दिले आहेत.