मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीमधील मृतांच्या वारसांना दिल्या जाणाऱ्या निवृत्तीवेतनाचा लाभ राज्यातील चौघा जणांना मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या मदतीसाठी १.२० लाखांचा निधी राज्य शासनाकडून अखेर हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. अहमदनगर आणि बुलडाणा जिल्ह्यातील हे लाभार्थी असून, त्यांच्या १२ महिन्यांची रक्कम संबंधित विभागीय आयुक्तालयाकडे सुपुर्द करण्यात आली असल्याचे महसूल विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.इंदिरा गांधी यांची ३१ आॅक्टोबर, १९८४ रोजी हत्या झाल्यानंतर संतप्त झालेल्या समर्थकांनी हिंसाचार केला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. त्याचे पडसाद दीर्घकाळ राजकारणात उमटत राहिले. दंगलीला जबाबदार असणा-या कॉँग्रेसच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करून खटला दाखल करण्यात आला होता. या दंगलीची चौकशी न्या.नानावटी यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडून करण्यात आली होती. त्यांनी सूचविलेल्या शिफारशीनुसार १६ जानेवारी, २००६ रोजी केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारने दंगलीतील मृतांच्या वारसांना प्रत्येक महिन्याला अडीच हजार रुपये निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतला. या दंगलीमध्ये राज्यातील चार नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पात्र वारसांना मदत देण्यात येत होती. दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला त्याबाबतच्या निधीची तरतूद केली जात असते. मात्र, २०१९-२० या आर्थिक वर्षातील निवृत्तीवेतन संबंधितांना अद्याप देण्यात येत नव्हते. आर्थिक वर्ष संपण्याला अडीच महिन्यांचा अवधी असताना अखेर महसूल विभागाने त्याबाबतची रक्कम संबंधित विभागाकडे वर्ग केली आहे.प्रत्येक महिन्याला अडीच हजार, याप्रमाणे चार मृतांच्या वारसांना वर्षाला प्रत्येकी ३० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नाशिक व अमरावती विभागीय आयुक्तालयाकडे ही रक्कम वर्ग करण्यात आली असून, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांपर्यत ती पोहोचविली जाणार आहे.दंगलीतील राज्यातील मृत व त्यांचे वारस१९८४ला झालेल्या भीषण दंगलीमध्ये राज्याचे रहिवासी असलेल्या चौघा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्णातील पिरु उर्फ पिरन हसन सय्यद व सतपाल सिंग नंदपालसिंग तर बुलडाणा जिल्ह्णातील दिनकर सीताराम डाबरे हे मृत्युमुखी पडले होते. पिरु यांची आई सुग्रबी सय्यद यांना, तर उर्वरित तिघांच्या पत्नींना पात्र वारसदार म्हणून निश्चित केले आहे. त्यांना शासनातर्फे निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील १९८४ च्या दंगलीतील मृतांच्या वारसांना पेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 2:59 AM