राम मंदिर निर्माणासाठी राम नाईक यांनी दिले निवृत्तीवेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:36 AM2021-02-05T04:36:29+5:302021-02-05T04:36:29+5:30
मुंबई : उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भाजप नेते राम नाईक यांनी आपले एक महिन्याचे निवृत्तीवेतन राम मंदिर निर्माणासाठी ...
मुंबई : उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भाजप नेते राम नाईक यांनी आपले एक महिन्याचे निवृत्तीवेतन राम मंदिर निर्माणासाठी दिले. राम मंदिराच्या निधी संकलनासाठी सुरू असलेल्या जनअभियानांतर्गत भेटीला आलेल्या स्थानिक भाजप नगरसेविका प्रीती सातम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाग कार्यवाह श्रवण राठोड यांच्याकडे नाईक यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रासाठी एक लाखाचा धनादेश सुपूर्द केला.
राज्यपाल असताना सुरू केलेल्या उत्तर प्रदेश स्थापनादिनीच अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिर निर्माणासाठी अल्प योगदान दिल्याने कर्तव्यपूर्तीचे समाधान लाभत आहे, अशी भावना यावेळी राम नाईक यांनी व्यक्त केली. या देशाच्या परंपरेचा व इतिहासाचा अभिमान असलेल्या प्रत्येक भारतीयाला राम मंदिर निर्माणकार्यात आपला सहभाग असावा, असे वाटत असेल, हे लक्षात घेऊन अगदी १० रुपयांचेही सहयोग कुपन काढण्याचा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे राम नाईक म्हणाले.