मुंबई : कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी कायद्यांतर्गत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत देशातील हजारो पेन्सनर बुधवारी आझाद मैदानात एकवटले होते. कमीत कमी तीन हजार रुपये पेन्शन देऊन ती महागाई भत्त्याशी जोडण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्या निवृत्त कर्मचारी समन्वय समितीचे मुंबई अध्यक्ष विनायक गोडसे यांनी केली आहे.गोडसे यांनी सांगितले की, मुळात सरकारने १९९५ साली ईपीएस योजना आणत फॅमिली पेन्शन योजनेतील ९ हजार कोटी रुपये वळते केले. मात्र पेन्शन योजनेत दर तीन वर्षांनी पुनरावलोकन करण्याची तरतूद असूनही तसे बदल सरकारने केलेले नाहीत. भगतसिंग कोशियारी समितीचा अहवाल महागाई भत्त्यासह लागू करावा. वैद्यकीय सुविधा सुरू कराव्यात. विधवा किंवा विधुरांना ५० टक्क्यांऐवजी १०० टक्के पेन्शन मिळावी. कॉम्युटेशनची रक्कम १०० हफ्त्यांनंतर पुनर्रचित करावी. १ सप्टेंबर २०१४ आणि ३१ मे २०१७ ही केंद्र शासनाने काढलेली दोन्ही परिपत्रके रद्द करावीत, अशी मागणी समन्वय समितीने केल्याचे गोडसे यांनी सांगितले.तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, पंजाब, गोवा, मध्य प्रदेश या राज्यांतील प्रमुख प्रतिनिधी मोर्चाला आले होते. केंद्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनात मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर १९ डिसेंबरला दिल्लीमध्ये देशव्यापी मोर्चा काढण्याचा इशारा समितीने दिला आहे. देशात पेन्शनधारकांची संख्या सुमारे ६३ लाखाच्या घरात आहेत. २० कोटी कामगारांतर्फे आत्ता ईपीएस भरणा होत आहे. तेवढेच पेन्शन धारक भविष्यात निर्माण होतील. त्यांच्या भविष्याचा हा प्रश्न आहे.कामगारांचे हित जपणे ही सरकारची जबाबदारी आहे़ त्यामुळे या मागण्या होतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़>राष्टीय मिल मजदूर संघाचा पाठिंबा : या मोर्चाला राष्ट्रीय मिल मजदूर संघाने जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी दिली. देशातील पेन्शनर कामगारांतून पेन्शन वाढीची मागणी जोर धरू लागली आहे. दिल्लीवर धडकणाºया मोर्चामध्ये कामगार मोठ्या संख्येने सामील होतील, असेही मोहिते यांनी स्पष्ट केले.>४८७ रुपये पेन्शनमध्ये कसे भागवायचे?आजघडीला बहुतेक पेन्शनधारकांना केवळ ४८७ रुपये पेन्शन मिळत आहे. त्यामध्ये जगायचे कसे? असा सवाल संघटनेचे चिटणीस रमाकांत कदम यांनी उपस्थित केला आहे. किमान ३ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह द्यावेत, अशी मागणी संघटनेने केल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.
पेन्शनर्सला हवी किमान ३ हजार रुपये पेन्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 3:36 AM