पेंटाग्राफ तुटला, प्रवाशांचा उद्रेक, मरे ठप्प
By admin | Published: January 2, 2015 10:08 AM2015-01-02T10:08:48+5:302015-01-02T13:59:33+5:30
ठाकूर्ली स्थानकाजवळ लोकल ट्रेनचा पेंटाग्राफ तुटल्याने शुक्रवारी मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली असून संतप्त प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरुन आंदोलन केल्याने मरे ठप्प पडली आहे.
ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. २ - ठाकूर्ली स्थानकाजवळ लोकल ट्रेनचा तुटलेला पेंटाग्राफ आणि विस्कळीत झालेली रेल्वे सेवा याविरोधात शुक्रवारी सकाळी दिवा स्थानकात प्रवाशांचा उद्रेक पाहायला मिळाला. संतप्त प्रवाशांनी रेल रोको केल्यामुळे सुमारे शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प पडली होती.
शुक्रवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास ठाकूर्ली स्थानकाजवळ लोकल ट्रेनचा पेंटाग्राफ तुटला आणि त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. कल्याणच्या दिशेने जाणा-या आणि सीएसटीकडे जाणा-या अशा दोन्ही मार्गांवरील धीम्या गतींची वाहतूक जलद मार्गांवर वळवण्यात आली. त्यामुळे कोपर, ठाकूर्ली स्थानकावरील प्रवाशांचे अतोनात हाल झाले. लोकल गाड्यांसंदर्भात मध्य रेल्वेकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांचा पारा चढला. सव्वा आठच्या सुमारास दिवा स्थानकावर संतप्त प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरुन आंदोलन केले. संतप्त प्रवाशांनी गाडीवर दगडफेक केली. काही अज्ञात व्यक्तींनी पोलिसांची जीप पेटवून दिली. तसेच दोन खासगी वाहनही पेटवण्याचा प्रयत्न केला.जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी जमावावर किरकोळ लाठीमार केला आहे. दगडफेकीत एक मोटरमनही किरकोळ जखमी झाल्याचे समजते. लोकलमध्ये खोळंबलेल्या अनेक प्रवाशांना भर थंडीत पायपीट करुन डोंबिवली स्टेशन गाठावे लागले.
------------------
प्रवाशांच्या आंदोलनामुळे हालात भर
सकाळी पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यावर आमचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. हा बिघाड तातडीने दूर करण्यात आला होता. प्रवाशांच्या सोयीसाठीच आम्ही धीम्या मार्गावर वाहतूक जलद मार्गांवर वळवली होती. मात्र आता दिव्यात प्रवाशांनी आंदोलन केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद पडली. - ए. के. जैन, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी
-------------------
रेल्वे प्रशासनाचे अपयश
अत्याधूनिक सेवासुविधा सुरु करण्याचा घाट घालणारी मध्य रेल्वे मूळात तांत्रिक बिघाड हाताळण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. दर आठवड्यात विविध तांत्रिक बिघाडांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होते. प्रशासनाने आधी लोकल सेवा वेळेवर चालवावी तेवढे दिले तरी पुरे होईल, पण हा रोजचा मनस्ताप नको अशी प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत आहे.