Join us

येत्या रविवारी छायाकल्प चंद्रग्रहण !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 2:36 PM

चंद्र आपल्या दृश्य आकाशात नसल्यानं छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही.

मुंबई : येत्या रविवारी दि. ५ जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण होणार आहे. परंतु ते भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना श्री. सोमण म्हणाले की, रविवारी ५ जुलै रोजी सकाळी ८-३४ ते ९-२५ यावेळेत चंद्र पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेतून जाणार आहे. परंतु त्यावेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात नसल्याने हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. हे छायाकल्प चंद्रग्रहण उत्तरपूर्व भाग सोडून आफ्रिका, युरोपचा दक्षिण-पश्चिम भाग, अंटार्टिका, उत्तर भाग सोडून अमेरिका, न्यूझीलंड येथून दिसणार आहे. यानंतर ३० नोव्हेंबर २०२० रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहणही भारतातून दिसणार नसल्याचे त्यानी सांगितले.रविवार, ५ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. त्यादिवशी  गुरुपौर्णिमा साजरी करण्यामध्ये या छायाकल्प चंद्रग्रहणाचा कोणताही अडथळा येणार नाही. तसेच छायाकल्प चंद्रग्रहणात कोणतेही ग्रहणविषयक धार्मिक नियम पाळायचे नसतात हेही श्री. दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :चंद्रग्रहण