आरेची जनता मूलभूत सुविधांपासून वंचित
By Admin | Published: June 6, 2016 01:43 AM2016-06-06T01:43:40+5:302016-06-06T01:43:40+5:30
गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीला निसर्गाचे वरदान लाभले असूनही येथील जनता मात्र आजही मूलभूत सेवा-सुविधांपासून वंचित आहे
मनोहर कुंभेजकर, मुंबई
गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीला निसर्गाचे वरदान लाभले असूनही येथील जनता मात्र आजही मूलभूत सेवा-सुविधांपासून वंचित आहे. आजही येथे वीज नाही, रस्त्यावर दिवे नाहीत. पाणी आहे, पण ते मध्यरात्री येते. झोपडपट्टीधारकांना आपली घरे दुरुस्त करता येत नाहीत. शौचालयांची संख्या पुरेशी नाही. विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय आणि अभ्यासिकांचा अभाव आहे. वाहतूक समस्येने तर नागरिक हैराण आहेत. वाहतूककोंडीमुळे येथील दोन ते अडीच तास प्रवासात जात आहेत. अशा अनेक समस्या रहिवाशांना भेडसावत असून, याच समस्यांचा पाढा नागरिकांनी ‘लोकमत आपल्या दारी’च्या व्यासपीठावर वाचला.
शनिवारी रात्री आरे कॉलनीमध्ये आदर्शनगर येथे नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘लोकमत आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुनील कुमरे, कोषाध्यक्ष दीपक शिंदे, पूजा शिंदे, सचिव धर्मराज टोकला, उपकोषाध्यक्ष विजय उबाळे, उपसचिव कमलेश वाडीवा, अॅन्थोनी डिसोझान चंदकांत कांबळे, भरत पगारे, संतोष चव्हाण, संदीप भोसले, गोरेगाव वाहतूक पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश शेटे, सहायक वाहतूक पोलीस निरीक्षक तुषार गोगावले, आगीविषयी कोणती काळजी घ्यायची? या विषयातील तज्ज्ञ सुरक्षा घोसाळकर, पालिकेच्या आरोग्य खाते, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि ‘लोकमत’चे वितरण व्यवस्थापक शरद सुरवसे आदी उपस्थित होते.मूलभूत सुविधांसाठी आरे प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन राऊत परवानगी देत नसल्यामुळे, येथील हजारो नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. परिणामी, आता जर मूलभूत सेवासुविधा सोडवण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर पंधरा दिवसांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल. येथील मुख्य रस्ता आरे प्रशासनाकडून पालिकेने ताब्यात घेतला. मात्र, हा रस्ता चौपदरी करण्याची घोषणा अद्याप महापालिकेने केलेली नाही. रस्त्यावर विजेचे खांब बसवले, पण दिवे नाहीत. आरे प्रशासनाने युनिट ५ येथील दवाखाना पालिकेकडे हस्तांतरित करून दोन वर्षे झाली, तरी येथील दवाखाना सुरू झालेला नाही. झोपडपट्टीधारक विजेपासून वंचित आहेत. येथील तलावात गणेशविसर्जन करण्यास मनाई केली जाते.
- सुनील कुमरेआरे येथील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी रस्ता रुंदीकरण करण्यात यावे. रस्त्याच्या मध्ये दुभाजक टाकण्यात यावे. गोरेगाव चेक नाका येथील झाडे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. ही झाडे तोडण्यासाठी अनेक वेळा पालिकेकडे पत्रव्यवहार केला. मात्र, यावर अद्याप कार्यवाही झाली नाही. अनेक वेळा वाहनचालक ओव्हरटेक करत असल्यामुळे वाहतूककोंडी होते. रस्ता आणि रस्त्याच्या कडेला असलेले अंतर भरण्यात यावे. आरे चेक नाका येथे विजेची व्यवस्था करण्यात यावी.
- प्रकाश शेटे,
वाहतूक पोलीस निरीक्षक,
गोरेगाव विभागखासगी अथवा सार्वजनिक ठिकाणी आग लागू नये, म्हणून सुरुवातीपासून काळजी घेण्याची गरज आहे. ही केवळ प्रशासनाची नाही, तर आपलीही जबाबदारी आहे. आगीची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी वेळेत दाखल होता यावे, म्हणून रस्ते उत्तम असणे आवश्यक आहे. अग्निशमन दलासमोर असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने लक्ष घातले पाहिजे, शिवाय शासनाने येथील अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे.
- सुरक्षा घोसाळकर