लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरोग्यसेवा देणारे कर्मचारी आणि प्रत्यक्ष आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या टप्प्याला यश मिळाल्यानंतर आता ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि कोमोर्बिडीटीज असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तिंचे लसीकरण (Corona Vaccine) करण्यात येत आहे. परंतु, लस घेताना ‘ॲनाफिलॅक्सिस’ म्हणजेच ॲलर्जिक रिॲक्शन असलेल्या व्यक्तिंनी ती घेऊ नये, असे निर्देश टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. राहुल पंडित यांनी दिले. (anaphylaxis, alegetic persons should avoid Corona Vaccination.)
लसीकरणापूर्वी व्यवस्थित आहार घ्यावा आणि शरिराला हायड्रेट ठेवावे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनसह सर्व मान्यताप्राप्त लसींमध्ये ‘कोविड-१९’मुळे होणाऱ्या मृत्यूला प्रतिबंध करण्याची १०० टक्के कार्यक्षमता, गंभीर कोविडविरोधात अत्यंत उच्च कार्यक्षमता, लक्षणे असलेल्या कोविडविरोधात उच्च ते मध्यम कार्यक्षमता (६० टक्के ते ९५ टक्के) आणि फक्त लक्षणे नसलेल्या कोविडविरोधात कमी कार्यक्षमता असल्याचे डॉ. पंडित यांनी सांगितले.
पूर्वी काेराेना झालेल्यांनी बरे झाल्याच्या ८ ते १२ आठवड्यांनंतर लस घ्यावी. काेराेनावर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेल्या व्यक्तिंनी बरे झाल्यानंतर लस घेण्यापूर्वी ८ ते १२ आठवडे प्रतीक्षा करावी. उच्च रक्तदाब, मधुमेह, रेनल फेल्युअर व हार्ट डिसीज असलेल्यांनी तसेच बायपास, पोस्ट-एंजिओग्राफी झालेल्या रुग्णांसाठी तसेच डायलिसीस उपचार घेत असलेल्या रूग्णांसाठी लस सुरक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.
फूड अॅलर्जी, औषधांची अॅलर्जी (लस घटकांपेक्षा इतर) आणि दमा, अॅलर्जिक - हायनायटिस व अॅलर्जिक डर्माटिटिस अशा सामान्य अॅलर्जिक आजारांनी पीडित व्यक्तिंसाठी लस सुरक्षित आहे. अस्पायरिन व क्लोपिडोग्रेलसारख्या ॲण्टी-प्लेटलेट एजंट्सनी पीडित व्यक्तिंनी त्यांचे औषधोपचार न थांबवता कोविड लस घ्यावी. वॉरफरिनसारखे ब्लड थिनर्स किंवा नवीन ॲण्टीकोग्युलेशन एजंट्सने पीडित व्यक्तिंना इंजेक्शन घेतल्याच्या जागी सूज येण्याचा कमी धोका असताे. स्ट्रोक, पार्किसन्स, डिमेन्शियासारख्या न्यूरोलॉजिकल आजारांनी पीडित व्यक्तिंसाठीही लस सुरक्षित आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका, डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या!
योग्य माहिती मिळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कोविड-१९ लसीकरण करत असलेल्या वैद्यकीय केंद्रांमधील डॉक्टरांशी सल्लामसलत करा. लक्षात ठेवा, व्हॅक्सिन-इंड्युस इम्युनिटी ही हर्ड इम्युनिटी इतकीच महत्त्वाची आहे. लसीकरण हे विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाशी सामना करण्याकरिता सध्याचा एकमेव उपाय आहे. म्हणूनच सर्वांनी एकत्र येऊन लढूया आणि महामारीचे निर्मूलन करूया, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.