मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गर्दी होणारी सर्वच ठिकाणं बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये धार्मिक स्थळांचाही समावेश आहे. मात्र, विविध राजकीय नेत्यांकडून धार्मिक स्थळं उघडण्याबाबत मागणी होताना दिसून येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे बंद असल्याने पुजारी आणि मंदिराच्या आसपासचे व्यावसायिक नाराज आहेत. अद्यापही मंदिरे सुरु करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय न घेतल्याने त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचे शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मंदिरे खुली केली जावीत असे आपलेही मत असल्याचे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले होते. योग्य खबरदारी घेऊन राज्यातील मॉल्स उघडू शकतात तर मंदिरे का नाही, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारतर्फे धार्मिक स्थळं उघडण्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
राजेश टोपे म्हणाले की, धार्मिक स्थळांबाबत लोक भावनिक असतात. त्यामुळे तिथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणार नाही. जर काटेकोरपणे पालन केले तर धार्मिक स्थळं सुरू करण्यास कोणी विरोध करणार नाही. मात्र ईश्वर हा सर्वत्र आहे. त्यामुळे थोडी सबुरी बाळगू, वेळ लागला तरी हरकत नाही, असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचे शिष्टमंडळाने सोमवारी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत राज्यातील मंदिरे सुरु करावीत अशी मागणी पुजाऱ्यांनी राज ठाकरेंकडे केली. यावेळी राज ठाकरेंनी कशाप्रकारे तुम्ही मंदिरे सुरु करणार, याची नियमावली आखा. मंदिरात झुंबड झाली तर काय करणार? याची नियमावली तयार करा, ही नियमावली राज्य सरकारकडे सुपूर्द करु अशी सूचना राज यांनी पुजाऱ्यांना दिली. मंदिरे खुली केली जावीत असे आपलेही मत आहे. पण इतर धर्मीयांचे काय? ते सर्व नियम पाळतील का? अशी शंकाही राज यांनी बैठकीत उपस्थित केली.
यापूर्वी भाजपाने देखील मंदिरे उघडण्यासाठी थेट राज्यपालांना निवेदन दिले होते. तर अलीकडेच राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनीही मंदिरे उघडण्याची भूमिका मांडली होती. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मात्र सबुरीचा इशारा दिला आहे. मंदिरे उघडल्यावर संक्रमण वाढल्यावर पुन्हा दोष तुम्ही सरकारला देणार. त्यामुळे मंदिरे उघडण्याची मागणी करणाऱ्यांनी थोडा संयम बाळगावा, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.