‘मेरी ख्रिसमस’साठी उत्साहाला उधाण!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 09:45 AM2023-12-25T09:45:47+5:302023-12-25T09:46:51+5:30

नाताळसाठी सजल्या बाजारपेठा, खरेदीसाठी गर्दी; चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई.

people are excited on the occassion of merry christmas in mumbai | ‘मेरी ख्रिसमस’साठी उत्साहाला उधाण!

‘मेरी ख्रिसमस’साठी उत्साहाला उधाण!

मुंबई : ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी जय्यत तयारी करत असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. ख्रिसमसनिमित्त ख्रिस्ती बांधवांनी सणाची जय्यत तयारी सुरू केली आहे. मिडनाइट माससह सकाळी होणाऱ्या प्रार्थनेत ख्रिस्ती समुदाय सहभागी होण्यासाठी सज्ज झाले होते. ख्रिसमससाठी शहरातील माहिम, वांद्रे, सांताक्रूझ येथील चर्चवरदेखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर दादर, क्राॅफर्ड मार्केट, मशीद बंदर येथील बाजारपेठा, सांता टोपी, बेल्स, ख्रिसमस ट्री, गिफ्ट पॅकेजसह सजावटीच्या साहित्यांनी सजल्या असून ख्रिसमसप्रेमी ‘जिंगल ऑल द वे...’ म्हणत सांताक्लॉजच्या स्वागताकरिता सज्ज झालेले आहेत.

लहान मुलांसाठी बाजारात सांताक्लॉजसारखे ड्रेस, कानटोपी, ग्लोव्हज, शूज, पोतडी बॅग्जही आल्या आहेत. बच्चे कंपनीत सांताक्लॉजचे खास आकर्षण असून चॉकलेट, गिफ्ट घेऊन येणाऱ्या सांताक्लॉजचे आकर्षक मुखवटे, टोपी यांची खरेदी होत आहे. 

घरातील सजावटीबरोबरच ख्रिसमस ट्रीच्या सजावटीकरिता लागणाऱ्या वस्तू, चांदण्या, चॉकलेट्स, झालर, बेल्स, सांताक्लॉजच्या मूर्ती, आकाशकंदील, रोषणाई व सजावटीचे साहित्य, भेटवस्तू यांनी अनेक दुकाने सजली असून, खरेदीसाठी स्ट्रीट शॉपिंग केली जात आहे.

केक अन् पेस्ट्रीवर ताव...

  नाताळच्या निमित्ताने भेट म्हणून केक देण्यास अधिक पसंती असते. ही पसंती पूर्ण करण्यासाठी विविध फ्लेवरचे केक विक्रीस सज्ज आहेत.

  यंदाच्या वातावरणावरून केक व्यवसाय तेजीत चालेल, असा विश्वास छोट्या, मोठ्या व्यावसायिक व घरगुती विक्रेत्यांनी व्यक्त केला.  

  वर्षभर मिळणाऱ्या केकपेक्षा नाताळातील केकही तसेच विशेष असतात. ते म्हणजे खास रिच प्लम आणि फ्रूट केक. यासोबतच फ्रेश क्रिम केक, पायनापल केक, चॉकलेट वॉलनट केक, रेड वेल्वेट केक, मँगो केक असे विविध केक ग्राहकांच्या पसंतीस उतरतात.

जिंगलबेल्सचे मराठी गाण्याचे व्हर्जनही तुफान व्हायरल ख्रिसमस म्हटले की, जिंगलबेल जिंगलबेल जिंगल ऑल द वे... हे गाणे लहानग्यांपासून अगदी मोठेही गुणगुणताना दिसतात. 

मात्र आता या गाण्याचे मराठी व्हर्जन इंटरनेटवर व्हायरल होत असून सगळ्यांच्याच पसंती उतरत आहे. घणघणती किणकिणती घंटा चोहीकडे, गंमत वाटे घोडागाडी घसरत जाई पुढे.. सांताक्लाॅज आला करू आनंदाला भेट देऊ या प्रीती जगाला जाऊ पुढे पुढे.. असे गाण्याचे बोल असून इन्स्टाग्रामवरील व्हिडीओला नेटिझन्सकडून लाइक्स मिळत आहेत. 

मिडनाइट मास..अन् कॅरल्स :

ख्रिसमसची तयारी शहरातील घरांसह चर्चमध्येही करण्यात आली आहे. चर्चमध्ये दिवसभर कॅरल्स गीते-आनंद गीते आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

घराघरांमध्येही ‘ख्रिसमस ट्री’ही सजविण्यात आले आहेत. रंगीबेरंगी मेणबत्त्या प्रज्वलित करून प्रार्थना करण्यात येणार आहे. घरांमध्ये देखावेही तयार केले आहेत. सांताक्लॉजच्या वेशभूषेतील लोक गुडी बॅगमधून लहान मुलांना भेटवस्तू देणार आहेत.  

मोठे ख्रिसमस ट्री, सांता अन् स्नोमॅनचे आकर्षण :

  मुंबईतील वांद्रे परिसरात ख्रिसमसचे उत्साहपूर्वक व चैतन्यमय वातावरण दिसून येते. यंदाच्या वर्षी वांद्रे येथे केलेले वांद्रे वंडरलँडची सजावट सामान्यांसाठी आकर्षक ठरत आहे. 

  या ठिकाणी ख्रिस्ती समुदाय मोठ्या प्रमाणात असल्याने सर्वच परिसरात आणि चर्चमध्ये आकर्षक रोषणाई, भव्य देखावे दिसून येतात. 

  त्याचप्रमाणे, अनेक निवासी वसाहतींमध्येदेखील आता मोठे ख्रिसमस ट्री, स्नो मॅन आणि सांताक्लाॅजची मोठी प्रतिकृती तयार करण्यात येत असल्याने बच्चे कंपनींमध्ये उत्साह दिसून येतो. या कलाकृती, सजावटींसह फोटो काढण्यासाठी सर्वांचीच गर्दी दिसून येते. 

Web Title: people are excited on the occassion of merry christmas in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.