लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाचे आज चित्र बदलत आहे. संपूर्ण देशात कुणी काहीही म्हटले तरी भाजपबरोबर जे जाऊ इच्छितात, लोक त्यांच्याबरोबर नाहीत. देशपातळीवरील चित्र बदलत आहे. सत्तेवरील लोक सत्तेचा गैरवापर करत आहेत. सत्ता लोकांसाठी वापरायची असते, इथे निर्णय सामान्य माणसाला शक्ती देणारे होत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मुंबई राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तुम्ही देशाचा नकाशा समोर ठेवा आणि प्रत्येक राज्याची स्थिती काय आहे याचा अंदाज घ्या. उत्तर प्रदेश आणि दोन- तीन राज्ये सोडली तर देशात भाजप दिवसेंदिवस कमी होत असल्याचे देशाचे चित्र आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर हे चित्र आणखी स्पष्ट होईल, असे सांगत शरद पवारांनी भाजपचा आलेख घसरत असल्याचे यावेळी सूचित केले.
खऱ्या राष्ट्रवादीचा संघर्ष काही मित्रांनी आपल्याला दिल्लीच्या कोर्टात नेले आहे, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात आपल्यावर खटले आहेत. या दोन्ही ठिकाणी जी खरी राष्ट्रवादी आहे तिच्यावर संघर्ष करण्याचा प्रसंग आपल्या काही जुन्या सहकाऱ्यांनी आणला. याचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा सामान्य माणसाच्या अंतःकरणात बसलेला खरा राष्ट्रवादी कोण याचा निकाल येईल आणि तो तुमच्या बाजूने होईल, असा विश्वास यावेळी पवारांनी बोलून दाखवला.
मुंबई अध्यक्षपदी राखी जाधवउपमुख्यमंत्री अजित पवार गटाने मुंबई अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती केल्यानंतर शरद पवार गटानेही आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी राखी जाधव यांची निवड केली आहे.