मुंबई - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. वर्षा बंगल्यावर झालेल्या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, यात राष्ट्रीय आणि राजकीय मुद्दे होते. दरम्यान, या भेटीनंतर चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचीही त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याची माहिती दिली.
उद्धव ठाकरे यांना भेटून आनंद झाला. उद्धव ठाकरे आणि आमचं अनेक विषयावर एकमत असल्याची माहिती के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी दिली. तसेच परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचं एक मत असल्याचं देखील के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं. महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत, असं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.
के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे- शरद पवारांच्या भेटीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. कोणी कितीही एक येऊ द्या, जनता भाजपासोबत आहे.लनिवडणुका ‘अर्थमॅटिक’ने नाही, तर ‘पॉलिटिकल केमेस्ट्री’ने जिंकल्या जातात, हे लक्षात असू द्या, असं देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. तसेच शिवछत्रपतींचा भगवा सुरक्षित ठेवायची जबाबदारी आता केवळ आणि केवळ भाजपावर आहे. काही तो केवळ मिरवत आहेत. या भगव्याचे रक्षण करायचे आणि तो सतत फडकत राहिला पाहिजे, ही जबाबदारी आता भाजपाने कार्यकर्त्यांच्या बळावर घेतली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
के. चंद्रशेखर राव मलाही भेटले होते-
एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असतो. त्यात काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असताना चंद्रशेखर राव मलाही येऊन भेटले होते. त्यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही. यापूर्वीही विरोधकांनी लोकसभेत आणि विविध राज्यांमध्ये हातात हात घालून आघाडीचे प्रयोग केले होते. त्यांचा प्रयोग फसला होता. औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
आघाडी सरकार सुडाचे राजकारण करतेय-
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिका कारवाई करणार आहे. यावर बोलताना, हे सरकार सुडाचे राजकारण करत आहे. मात्र, न्यायालय आहे. त्या संदर्भात योग्य कार्यवाही करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दररोज काय होत आहे. हे सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. राणेंवर काय कारवाई झाली, त्यांच्या मुलाबाबत काय झाले. सोमय्यांचा कशा पद्धतीने जीव घेण्याचा प्रयत्न झाला. रवी राणांबाबत काय चालले आहे, हे सगळे जनता पाहत आहेत. सुडाचे राजकारण कोण करत आहे सर्वजण पाहत आहेत. सरकारची सुडाची भावना त्यातून पुढे येत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.