४० आमदारांना गाडण्यासाठी लोकं मतदानाची वाट पाहतायेत, शिवसेनेची जबरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 02:26 PM2022-11-02T14:26:47+5:302022-11-02T14:40:56+5:30
राज्यात विद्यमान परिस्थितीत खोटेगिरी सुरू असून शेतकऱ्यांवरती अन्याय होत आहे.
मुंबई - एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर आता शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन वाद सुरू आहे. आता दोन्ही गटांकडून पक्षावर हक्क सांगितला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे-शिंदे या दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्यासाठी आणखी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. आता पुढील सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावरून शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये सातत्याने वादविवाद पाहायला मिळत आहे. एकमेकांवर टीका करण्यात सर्वच नेते अग्रेसर दिसत आहेत. शिवसेना नेता आणि खासदार अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील ४० आमदारांवर जबरी टीका केली आहे.
राज्यात विद्यमान परिस्थितीत खोटेगिरी सुरू असून शेतकऱ्यांवरती अन्याय होत आहे. राज्य सरकारने घोषणा केलेला आनंद शिधा अजूनही मिळतोय, निदान तुळशीच्या लग्नापर्यंत मिळावा, अशी अपेक्षा अरविंद सावंत यांनी व्यक्त केली. तसेच, या ४० आमदारांना गाडण्यासाठी लोक वाट पाहत आहेत, महाराष्ट्रातील जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा महाराष्ट्राची जतना या लोकांना आपली घर दाखवतील, अशा शब्दात सावंत यांनी ४० आमदारांवर टीकास्त्र सोडले.
निवडणूक संदर्भात न्यायालयीन लढाई सुरू आहे, 29 तारखेला काय होते ते पाहुयात. संतोष गावडे नावाच्या मुलाने 31 ऑक्टोबरला पत्र लिहिले आणि 31 ऑक्टोंबर रोजीच या पत्राचे उत्तर आरटीआयच्या माध्यमातून आले आहे. म्हणजे, ड्राफ्ट रेडीच होता. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीने टाईमलाईन देऊन सत्ताधाऱ्यांची चिरफाड केली आहे, हिंमत असेल तर समोरासमोर या आणि बोला, असे आव्हानही सावंत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले. महाराष्ट्रात RTI ऍक्टिव्हीटीला मी खरंच आव्हान करतो, तुम्हाला आरटीआयचं उत्तर हे 24 तासात मिळालं पाहिजे इथे त्यांनी 24 तासाच्या आत दिलं आहे, असे सावंत यांनी म्हटले.