लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मनसेला अपेक्षेप्रमाणे मतदान होत नसल्याबाबत अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुन्हा नाराजी व्यक्त केली. मनसेचे कार्यकर्ते सगळ्या प्रसंगात सगळीकडे धावून जातात. सगळीकडे लोक प्रश्न घेऊन येतात; पण मतदानाच्या वेळी हे लोक कुठे जातात, असा सवाल राज यांनी मुंबईतील कार्यक्रमात केला.
मनसे साधन सुविधा विभागाचा पाचवा वर्धापन दिन रवींद्र नाट्यमंदिर येथे रविवारी पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत मनसेच मदतीला येते. प्रत्येकवेळी आपत्तीत आपण धावून जातो. नाशिकला मला अनेक शेतकरी बांधव भेटायला आले. ते मला अनेक प्रश्न सांगत होते. मी त्यांना त्यांच्या भागातील आमदार, खासदार कोण विचारले, जिल्हा परिषद कुणाच्या ताब्यात आहे विचारले. त्यांनी या पक्षाची असल्याचे सांगितले. त्यावर जे पिळवणूक करतात त्यांच्याच हातात सत्ता देणार असाल, तर मग माझ्याकडे येता कशाला, असे त्यांना विचारल्याचे राज म्हणाले.